प्रभाग अधिकारी ठरवेल ते धोरण आणि बांधेल ते तोरण अशी गेली अनेक वर्षे कार्यप्रणाली असलेल्या नवी मुंबईतील प्रभाग अधिकारी नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अचानक होणाऱ्या भेटीने धास्तावले असून रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशीदेखील कार्यालये खुली ठेवून काम करीत असल्याचे चित्र आहे. एखाद्या कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याची जरब कशी तळागाळापर्यंत पोहोचते याची ही झलक आहे. दिघा येथील प्रभाग कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आयुक्त केव्हाही आपल्या कार्यालयात धडकतील या भीतीने ऐरोली प्रभाग कार्यालय रविवारी खुले ठेवून साफसफाई करण्यात आली होती.
जानेवारी १९९२ रोजी स्थापन झालेल्या नवी मुंबई पालिकेत आतापर्यंत डझनभर आयुक्त येऊन गेले. त्यात पहिले प्रशासक एम. रमेश कुमार, डॉ. प्रेमसिंग मीना, जयराज पाठक, सुनील सोनी, हे कडक शिस्तीचे आयुक्त म्हणून मानले जातात. यात रमेश कुमार व प्रेमसिंग मीना यांच्या समोर जाण्यास अधिकारी देखील धजावत नव्हते. या दरम्यान आलेले काही आयुक्त हे पदोन्नतीने सनदी अधिकारी झाल्याने त्यांची म्हणावी अशी जरब प्रशासनावर नव्हती. नुकताच पदभार स्वीकारलेले तुकाराम मुंढे यांची शिस्तप्रिय सनदी अधिकारी म्हणून ओळख आहे. सोलापूर मध्ये सत्ताधारी भाजपच्या पालकमंत्र्यांशी संघर्ष करण्यास मागेपुढे न पाहणारे मुंढे यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यास प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या प्रभाग कार्यालयांना अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम आखला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिघा या शहरातील शेवटच्या प्रभाग कार्यालयात भेट देऊन दोन अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली. त्यामुळे पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मुख्यालयात जीन्स पॅण्ट घालून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी शासकीय सेवेतील गणवेशाचा ड्रेसकोड समजावून सांगितला आहे तर जेवणाच्या सुट्टीत गप्पाटप्पा मारत सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी उपाहारगृहात न जाता आळीपाळीने जाण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय कर्मचारी हे जनतेचे सेवक असल्याने संपूर्ण कार्यालय रामभरोसे टाकून जाण्यास त्यांनी मज्जाव केला आहे. आयुक्तांच्या या सेवाशर्तीमुळे धास्तावलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रभाग कार्यालय स्वच्छ व साफसफाई करण्यास प्राधान्य दिले आहे. यात अस्ताव्यस्त ठेवल्या जाणाऱ्या फाइल्स नीटनेटक्या ठेवल्या जात असून कार्यालयाचे वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घेतली जात आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी पदावरून थेट नवी मुंबई पालिकेचे आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेले मुंढे सध्या उन्हाळी सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. २० मेपर्यंत आयुक्त सुट्टीवर असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तूर्त सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.