पालिकेचे संकेतस्थळ बंद; कामांची रखडपट्टी

ऑनलाइन, पारदर्शक कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्यामुळे केवळ शोभेपुरतेच उरले आहे. विविध कामांसाठी आणि माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळाला भेट देणारे नागरिक, तक्रारदार आणि ठेकेदार या त्रस्त झाले आहेत. लहानमोठय़ा कामांसाठी पालिकेत खेपा घालाव्या लागत असल्यामुळे त्याचा वेळ वाया जात आहे. ई प्रणालीकडे वाटचाल करत असल्याची शेखी मिरवणाऱ्या पालिकेच्या बंद पडलेल्या संकेतस्थळामुळे ई-सेवेचा बोजवारा उडाला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे (nmmc.gov.in) हे संकेतस्थळ वारंवार बंद पडते. संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांना ‘धिस साइट कान्ट बी रिच्ड्’ असा संदेश वाचून बाहेर पडावे लागते. नवी मुंबईतील दैनंदिन घडामोडी, ऑनलाइन निविदा प्रक्रिया याविषयी जाणून घेण्यासाठी, मालमत्ता देयक, पाणी देयक भरण्यासाठी, विविध प्रकाराचे दाखले मिळवण्यासाठी अनेक नवी मुंबईकर या संकेतस्थळाला भेट देतात. काही दिवसांपासून महानगरपालिकने ऑनलाइन तक्रारीचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. तक्रारी नोंदवण्यासाठी संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांचाही भ्रमनिरास होत आहे.

असल्याने भेट देणाऱ्यांना माहिती व निविदा भरण्यासाठी थेट पालिका मुख्यालय गाठावे लागते. प्रभाग कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. नवी मुंबई महानगरपालिका ऑनलाइन सुविधेचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे वारंवार बंद पडणाऱ्या या संकेतस्थळाची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती त्याचबरोबर करपट्टी व पाणी देयकाबाबत माहिती घेण्यासाठी या संकेतस्थळाला भेट देतो, मात्र मागील काही दिवसांपासून संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे पालिकेची कोणतीही माहिती मिळत नाही. पालिकेने ही सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी अ‍ॅड. विशाल मोहिते यांनी केली आहे. संबंधित विभागाकडे विचारणा करून माहिती घेण्यात येईल. व संकेतस्थळ लवकरच पूर्ववत करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, यांनी सांगितले.

Story img Loader