मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असली तरी नवी मुंबई शहरात गोवर रुग्ण नियंत्रणात आहेत. सुरुवातीपासूनच नवी मुंबई शहरात लहान बालकांना त्या-त्या वेळी गोवरचे लसीकरण झाल्याने आज शहरात गोवर ग्रस्त रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. तरी देखील गोवर- रूबेला आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून नियोजनबद्ध पावले उचलण्यात येत आहेत .त्यानुसार डिसेंबर व जानेवारी महिन्यात विशेष गोवर लसीकरण मोहीम आखण्यात आली आहे.
हेही वाचा- नवी मुंबई शहरावर राहणार १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
गोवर प्रतिबंधाकरिता ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण करण्याकरिता विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणार आहे. ४ आठवड्याच्या अंतराने २ मोहीमा घेऊन २६ जानेवारी २०२३ पर्यंत या मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. या विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीमेची पहिली फेरी १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत तसेच दुसरी फेरी १५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.
हेही वाचा- ट्रान्स हार्बर मार्गावरील जुईनगर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा खोळंबा
महापालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात २ पेक्षा अधिक रुग्ण आढळलेले १८ उद्रेक असून त्यातील ३ उद्रेक बंद करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित १५ उद्रेकांपैकी ५ गोवर उद्रेक म्हणून घोषित करण्यात येऊन त्याठिकाणी अतिरिक्त डोस व झिरो डोस प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. या मोहीमेअंतर्गत उद्रेक नसलेल्या कार्यक्षेत्रात वंचित गोवर रुबेला डोस पहिला व दुसरा पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच गोवर आजार उद्रेकग्रस्त भागात अतिरिक्त गोवर रुबेला डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेत २३२ अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले असून ६२८ बालकांना पहिला डोस व ६१८ बालकांना दुसरा डोस अशा प्रकारे १२४६ बालकांना प्राप्त सूचीप्रमाणे लसीकरण करणेबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत कृती आराखडा सादर करण्यात आला. तरी ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे त्यांच्या पालकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.