नवी मुंबई : एकेकाळी सुबक बांधकाम आणि स्वच्छतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांना अलिकडच्या काळात अस्वच्छतेचा बट्टा लागत आहे. परिणामी नवी मुंबई महापालिकेने पुढील काही महिन्यांसाठी या स्थानकांमध्ये स्वच्छता राहील याकडे लक्ष देण्याचे ठरविले आहे. वाशी ते बेलापूर आणि दिघा-नेरुळ-बेलापूर या स्थानकांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष निरीक्षक नेमण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डाॅ.कैलास शिंदे यांनी घेतला आहे.

सद्यस्थितीत या स्थानकांमधील साफसफाईची जबाबदारी सिडको प्रशासनाकडे आहे. अतिशय वर्दळीची ठरू लागलेल्या या स्थानकांमध्ये पानाच्या पिचकाऱ्या, कचरा आणि स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त नवी मुंबई शहर यामुळे पिछाडीवर राहू नये यासाठी महापालिकेने आता स्थानकांच्या स्वच्छतेसाठी विशेष निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई शहर हे सुरुवातीपासून देशातील स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर येत असते. राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान या शहराला अनेकवेळा मिळाला आहे. साफसफाई यंत्रणांमार्फत केले जाणारे नीटनेटके काम, सार्वजनिक स्वच्छतेवर दिला जाणारा भर, स्वत:ची उत्तम अशी कचराभूमी यामुळे स्वच्छतेच्या आघाडीवर नवी मुंबईचा नावलौकिक कायम राहीला आहे. असे असले तरी महामार्ग आणि रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेचा फटका शहर स्वच्छतेतील सर्वेक्षणात सातत्याने बसत असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे यंदा महामार्गासह महापालिका हद्दीत येणाऱ्या वाशी ते बेलापूर आणि दिघा-नेरुळ-बेलापूर या स्थानकांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष निरीक्षक नेमण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डाॅ.कैलास शिंदे यांनी घेतला आहे.

महामार्गावरही लक्ष

महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांमध्ये सायन-पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या महामार्गावर जड वाहनांची कायम वर्दळ असते. त्याचप्रमाणे जेएनपीटीकडे जाण्यासाठीही या रस्त्यावरुनच वाहतूक होते. त्यामध्ये बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या जड वाहनांचाही समावेश होतो. त्यामुळे या रस्त्याची नियमित स्वच्छता ठेवणे हे एक आव्हान आहे. या महामार्गाची दुरवस्था आणि सतत सुरू असणारी दुरुस्तीची कामे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे महामार्गाच्या स्वच्छतेकडेही आता महापालिकेने लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गाच्या दुतर्फा सातत्याने सखोल स्वच्छता मोहीमा आयोजित करण्यात येत आहेत. येथील सातत्यपूर्ण स्वच्छतेबाबत आयुक्तांनी आढावा बैठकीत महानगरपालिकेच्या वतीने विशेष पथक गठीत करण्याचे निर्देश दिले असून या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नियमित संपर्कात राहून सायन पनवेल महामार्गावरील स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देण्याचे ठरविण्यात आले आहे. अशाच प्रकारे नवी मुंबईतील १२ रेल्वे स्थानके व परिसरातील स्वच्छतेसाठी देखील पथके तैनात केली जाणार आहेत.

स्वच्छ नवी मुंबई अभियानात सर्व प्राधिकरणांचे सक्रिय सहकार्य अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, रेल्वे, एमआयडीसी अशा सर्व संबधित प्राधिकरणांशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवला जात असून त्याद्वारे महामार्ग, रेल्वे स्थानके, परिसर, एमआयडीसीतील परिसराच्या सफाईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. नवी मुंबईतील स्वच्छतेचा विचार करता इतर प्राधिकरणांच्या अखत्यारित असलेले हे सर्व परिसर महत्वाचे आहेत. डाॅ.कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका