लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचे संस्कार झाले तर त्याचा प्रभाव संपूर्ण आयुष्यभर राहतो हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरिता प्लास्टिमॅन, ड्राय वेस्ट बँक सारख्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांप्रमाणेच आता ‘वेस्ट टू बेस्ट ’ उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत असून टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना साकारली जात आहे.
हेही वाचा- ग्रामस्थांचा द्रोणागिरी बचावचा नारा, पोखरणीमुळे करंजामधील नागरिकांचे मुखमंत्र्यांना साकडे
स्वच्छता विषयक चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचेही आयोजन करण्यात येत असते. या सर्व स्पर्धांना मिळणारा मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन अशाच प्रकारचे आगळेवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करताना प्लास्टिक कचरा, टाकाऊ लाकूड, काच, पेपर अथवा कार्डबोर्ड, ई वेस्ट अशा विविध स्वरुपातील कचरा म्हणून टाकून दिल्या जातील अशा साहित्याचा वापर करून कल्पकतेने आकर्षक वस्तू तयार करणे अपेक्षित आहे. या माध्यमातून मुलांमधील कल्पनाशक्तीला चालना मिळणार असून कचऱ्याचे मूल्य मुलांच्या मनावर नकळतपणे बिंबवले जाणार आहे.
‘वेस्ट टू बेस्ट प्रोजेक्ट’ असे उपक्रम असून दि.२३ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी आपापल्या नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून सादर करावायाच्या आहेत. या स्पर्धेमध्ये प्रत्येक महानगरपालिका शाळेतून इयत्ता पहिली ते पाचवीचा प्राथमिक गट, इयत्ता सहावी ते आठवीचा उच्च प्राथमिक गट आणि इयत्ता नववी चा माध्यमिक गट अशा ३ गटांतून प्रत्येकी ३ अशाप्रकारे एकूण ९ सर्वोत्तम प्रकल्पांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक शाळांतून निवडलेले हे ९ प्रकल्प अंतिम फेरीसाठी २४ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका मुख्यालय स्तरावर पाठविण्यात येणार असून त्याठिकाणी त्यांचे मूल्यमापन होऊन अंतिम विजेत्या प्रकल्पांची निवड केली जाणार आहे.