नवी मुंबई महानगरपालिका ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ चा प्रचार व प्रसार करणार
नवी मुंबई : मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात ‘नागरिकांचा प्रतिसाद’ या क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहर म्हणून मानांकित नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ बाबत जागरूकता निर्माण व्हावी याकरिता शहरात ठिकठिकाणी फिरून जनजागृती करण्यासाठी स्वच्छता प्रचार रथ बनविण्यात आला आहे. या प्रचार वाहनाचा शुभारंभ महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वच्छतेच्या जनजागृती प्रचार रथावर ‘कचरासुरा’ची प्रतिकृती बनविण्यात आली असून त्याला चेंडू मारल्यावर तो निश्चित ठिकाणी लागल्यास कचरासुराचा नाश केल्याबद्दल बक्षीस देण्यात येणार आहे. याव्दारे खेळाच्या स्वरूपात मनोरंजनाव्दारे कचरामुक्तीचा संदेश प्रसारित केला जाणार आहे.
त्याचप्रमाणे या वाहनावर एल.ई.डी. स्क्रीनव्दारे कचरा निर्मूलनाविषयी जनजागृतीपर संगीतमय क्लिप्स प्रसारित केल्या जाणार आहेत.
आकाशी निळ्या रंगात सजविलेले हे वाहन लक्षवेधी असून त्यावर ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा यांचे प्रतीकात्मक डबेही नागरिकांच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आले आहेत. हा प्रचाररथ संपूर्ण नवी मुंबईत फिरून चौकाचौकांत, गल्लीगल्लीत स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणार आहे.