जयेश सामंत, लोकसत्ता
नवी मुंबई : शहरातील एक महत्त्वाचा शासकीय टापू असणाऱ्या सीबीडी बेलापूर भागातील एका निसर्गरम्य टेकडीवर सिडकोने दोन दशकांपूर्वी वसविलेल्या ‘अर्बन हाट’ (कलाग्राम) या कला, खाद्यासंस्कृती आणि सांस्कृतिक उपक्रमांचे मिश्रण असलेल्या सांस्कृतिक केंद्रावर नवी मुंबई महापालिकेने दावा सांगितला आहे. वेगवेगळ्या राज्यांतील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हस्तकला, कलावस्तूंच्या व्यापक प्रदर्शनांचे ठिकाणासाठी प्रसिद्ध असणारे हे केंद्र पुढील दहा वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव सिडकोने तयार केला आहे. या प्रस्तावास हरकत घेत महापालिकेने हे संपूर्ण केंद्र महापालिकेस चालविण्यास द्यावे अशा स्वरूपाचा नवा प्रस्ताव सिडकोपुढे ठेवला आहे.
नवी मुंबईसारख्या शहरात देशातील वेगवेगळ्या प्रांतातील लोककलेला एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सिडकोने सीबीडी बेलापूर सेक्टर १५ येथील मध्यवर्ती ठिकाणी काही वर्षांपूर्वी अर्बन हाटची उभारणी केली. सिडकोच्या बहुचर्चित कलाग्राम उपक्रमाच्या माध्यमातून बेलापूर रेल्वे स्थानकामागे असलेल्या एका निसर्गरम्य टेकडीवर पाच हेक्टर क्षेत्रफळात या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. निसर्गरम्यतेमुळे हे स्थान विरंगुळ्यासाठी योग्य ठरल्याने सुरुवातीच्या काळात या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. याशिवाय या ठिकाणी सिडकोमार्फत कला, खाद्यासंस्कृती आणि वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रमही नियमित भरविले जात असतात. विविध राज्यांमधील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हस्तकला, कलावस्तूंचे व्यापक प्रदर्शन तसेच विक्री केंद्र येथे उभे राहावे यासाठी सिडकोने नेमलेल्या खासगी संस्थेकडून प्रयत्न केले जात असतात.
आणखी वाचा-बंद कंपनीला आग ; तीन तासांच्या प्रयत्नांनी अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण
ग्रामीण कलावंतांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीनेही राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत या ठिकाणी प्रदर्शो भरविली जात असतात. हातमाग, हस्तकलेचे प्रदर्शन, वसंत मेळा, हिवाळी प्रदर्शन तसेच वेगवेगळ्या खाद्या महोत्सवांचीदेखील या ठिकाणी अधूनमधून रेलचेल असते. वार्षिक स्नेहसंमेलनासाठी या ठिकाणी अॅम्पीथिएटरची उभारणीही सिडकोने केली आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या केंद्राला कोविडकाळात मात्र उतरती कळा लागल्याचे पाहायला मिळाले होते.
असे असले तरी सिडकोच्या या भाडेपट्टा करारास नवी मुंबई महापालिकेने हरकत घेतली असून मोक्याच्या ठिकाणचे हे अर्बन हाट हस्तांतरित करावे अशी मागणी सिडकोकडे केली आहे. हे केंद्र नवी मुंबई महापालिका हद्दीत असून या केंद्राचा मूळ उद्देश आबाधित राखून ते प्रभावीपणे चालविण्यासाठी ते विनाशुल्क हस्तांतरित केले जावे असा प्रस्ताव महापालिकेने सिडकोकडे दिला आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फत लवकरच या केंद्राचा पाहणी दौरा केला जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणची व्यवस्था आणि देखभालीचा सविस्तर आराखडा सिडकोकडे सादर केला जाईल, असे देसाई यांनी सांगितले.
आणखी वाचा-नैना प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा; नैनाचे मुख्य नियोजनकार रवींद्रकुमार मानकर यांची माहिती
निविदा निश्चितीचा प्रयत्न
दरम्यान हे केंद्र पुढील दहा वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा प्रस्ताव सिडकोने मध्यंतरी तयार केला होता. हे केंद्र चालविणे तसेच देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सिडकोकडून एक निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार वर्षाला किमान २५ लाख रुपयांचा भाडेपट्टा या केंद्रासाठी निश्चित करण्यात आला होता. निविदा प्रक्रियेनंतर हे केंद्र मेसर्स सर्जिसोव हेल्थ केअर आणि श्री साई आर्ट या दोन संस्थांना भागीदारीतून देण्याचे नक्की करण्यात आले होते. यासाठी वार्षिक ३५ लाख रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे.
अद्याप महापालिकेकडून कोणताही प्रस्ताव नाही
अर्बन हाटसंबंधी सिडकोकडून राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस चांगला प्रतिसाद मिळाला असून वर्षाला ३५ लाख रुपयांच्या भाडेपट्ट्याची निविदा महापालिकेच्या मागणीनंतर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सिडकोतील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली. हे केंद्र महापालिकेस देता येईल का यासंबंधी सिडकोतील प्रशासकीय वर्तुळात विचार सुरू असून महापालिकेकडून अद्याप यासंबंधी कोणताही लेखी प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.