नवी मुंबई : पुरेशी रहदारी नसतानाही नवी मुंबईत काही आडवाटेला असलेल्या चौकांच्या परिसरातील रस्त्यांची काँक्रीटीकरणाची कामे हाती घेत वादात सापडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने पावसाळा संपला तरी बऱ्याचशा चौकांमधील कामे अर्धवट अवस्थेत ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यात या कामांचा प्रवाशांना त्रास होत असल्याने ही कामे थांबिवण्यात आली होती. परंतु पावसाळा झाल्यानंतरही जवळपास १० चौकांची कामे ठप्प झाली आहेत.
नवी मुंबई शहरातील वेगवेगळ्या भागात महापालिकेने काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली. हे करत असताना दोन-सव्वादोन वर्षांपूर्वी शहरातील ठरावीक चौक परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरणही करण्याचा सपाटा लावला. शहरातील अनेक उपनगरातील बहुतांश चौकात वाहनांची फारशी वर्दळ नाही. वाशी सेक्टर सहा, सात अशा परिसरात तुरळक गर्दीच्या ठिकाणच्या रस्त्यांनाही काँक्रीटचा मुलामा चढविण्यात आला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. बेलापूर ते दिघा या उपनगरांमध्ये महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ७९ चौक परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. यापैकी किती चौकांच्या परिसरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची खरेच आवश्यकता होती हा संशोधनाचा विषय ठरला असतानाच हाती घेण्यात आलेली कामेही काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा…पनवेलकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा; प्रदूषणामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ
अर्धवट कामे कोणत्या ठिकाणी ?
डी मार्ट चौक सीवूड, सावला चौक सीवूड, गणपतशेठ तांडेल मैदान सीवूड तसेच बेलापूर उपनगरातील काही ठिकाणी चौकातील काँक्रीटीकरणाची कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे चित्र आहे. वाशी येथील शिवाजी चौकात करण्यात आलेले काँक्रीटीकरणाचे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे आक्षेप प्रवाशांकडून घेतले जात आहेत. वाशी येथील अग्निशमन केंद्रालगत झालेले काँक्रीटीकरण तसेच वाशी सेक्टर सहा, सात परिसरातील चौकात करण्यात आलेल्या कामांचा दर्जाविषयी देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा…औद्योगिक पट्टयातील हिरवाई धोक्यात? वनराई असलेल्या भूखंडविक्रीस पर्यावरणप्रेमींचा विरोध
शहरातील एकूण चौक-१३३
काँक्रीटीकरण पूर्ण झालेले चौक- ७९
अद्याप सुरू असलेल्या चौकांच्या काँक्रीटीकरणाची कामे- १७
अद्याप काँक्रीटीकरण न केलेल्या चौकांची संख्या- ३७