नवी मुंबई : स्वच्छ शहरांत नवी मुंबई चा समावेश होत असून महापालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. मागील वर्षभरापासून सातत्याने मुदतवाढ देण्यात येणाऱ्या कचरा वाहतूक व संकलनाची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली असून पालिकेच्या इतिहासात प्रथमच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधाही राबवली जाणार आहे. १३ मेपर्यंत निविदा स्वीकारण्याची मुदत देण्यात आली.
आतापर्यंत कचरा वाहतूक व संकलनासाठी वारंवार जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ दिली जात होती. त्यातच पालिकेला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रकल्प अहवाल प्राप्त होण्यासाठी बराच कालावधी लागला होता. त्यामुळे आता पालिकेने या कामाबाबत निविदा काढली असून मागील काम हे २४०० रुपये टनाप्रमाणे देण्यात आले होते. त्यामुळे यावेळची निविदा किती कोटीपर्यंत जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा…विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेमधील बाधितांना लोकसभा निवडणूकीनंतर भूसंपादनाचा मोबदला मिळणार
पालिकेने कचरा वाहतूक व संकलनासाठी मार्च २०१५ ते मार्च २०२२ पर्यंत शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या ठेकेदाराला काम दिले होते. परंतु, संबंधित ठेकेदाराची मुदत संपल्याने पालिकेने याच ठेकेदाराला पुन्हा कामासाठी मुदतवाढ दिली ती २०२४ मार्चपर्यंत वाढवली. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा केल्या जात होत्या.
नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत मे. ए. जी. एनव्हायरो ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे. कचरा वाहतूक व संकलनासाठीचा विस्तृत असा प्रकल्प अहवाल पालिकेला प्राप्त झाल्याने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावतीने बनवण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबवली गेली आहे.
यंदा कचरा वर्गीकरणाची व्याप्ती नव्या निविदा प्रक्रियेत वाढवली जाणार आहे. विविध पध्दतीचा कचरा वेगळा करण्याचा पालिकेचा मानस आहे. ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण तसेच प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अशा कचऱ्याचे वर्गीकरण करुन कचरा संकलन केले जाणार आहे. तसेच एकीकडे सर्वत्र इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर सुरु झाला असताना कचरा वाहतुकीसाठीही छोट्या इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करण्याबाबतही विचार केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगामी कचरा वाहतूक व संकलन निविदा कोट्यवधींच्या घरात जाणार असून शहराला देशात स्वच्छतेबाबत मिळालेला नावलौकिक टिकवण्यासाठी व सातत्याने वाढवण्यासाठी पालिका योग्य ती खबरदारी घेणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा…उष्णतेमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
कचरा वाहतूक व संकलनासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली असून ई वाहनांचाही वापर केला जाणार आहे. गावठाणांतील कचरा संकलनाबाबतही नव्या निविदेत प्राधान्य देण्यात आले आहे. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नमुंमपा