नवी मुंबई : नवी मुंबई शहराली मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे वेध लागले आहेत. शहरात आतापर्यंत राजकीय प्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने पुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. आता नवी मुंबई महापालिकाच पुनर्विकासाच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणार आहे.

पालिकेने नुकतीच यंदाच्या आर्थिक वर्षातील वसुलीची आकडेवारी जाहीर केली. पालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक ८२६.१२ कोटी मालमत्ता कर वसुली झाली. त्यात पालिकेच्या उत्पन्नात पुनर्विकास प्रकल्पांच्या परवानगीमुळे तब्बल ७८ कोटी वाढीव उत्पन्नाची भर पडली. तसेच आगामी ५ वर्षांत शहरातील पुनर्विकास प्रकल्पांमुळे पालिकेच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होईल, अशी खात्री नगररचना विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाच्या वाढत्या आलेखाला पुनर्विकास प्रकल्पांची साथ लाभणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात ३० वर्ष पूर्ण झालेल्या व ३० वर्षे पूर्ण होऊ घातलेल्या इमारतींच्या पुनर्विकासचे वेध नागरिकांना लागले आहेत.

शहरात सर्वात झपाट्याने विकास होत असताना वाशी,नेरुळ, कोपरखैरणे, बेलापूर अशा विविध विभागात पुनर्विकासा प्रकल्पांना सुरवात झाली आहे. ३० वर्ष झाल्येल्या इमारतीमधील रहिवाशांनी पुनर्विकासाची धडपड सुरू केली असून स्वयंपुर्नविकासाबाबतही संस्थांमार्फत मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. पालिकेने नवी मुंबई शहरात विकासकांमार्फत सीवूड्स येथे झालेल्या गृहविक्री प्रदर्शनात पालिकेनेेही पुनर्विकासाबाबत माहिती देणारे एक स्टॉल उभारले होते. त्या स्टॉलला अनेक नागरिकांनी भेट दिली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना पुनर्विकासाबाबत अधिक माहिती देण्यासाठी तसेच पालिकेची एसओपी या सर्वांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पालिका लवकरच पुनर्विकासाबाबतचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याच्या तयारीत आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात नगररचना विभागामार्फत ३८१.९० कोटी जमा झाले आहेत. यात पुनर्विकास प्रकल्पांचा मोठा वाटा आहे. यंदा ७८ कोटींची वाढ झाली असून आगामी काळात पुनर्विकासामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार हे निश्चित आहे. शहरातील नागरिकांना पुनर्विकासाबाबतचे व नियमावलीबाबतचे योग्य मार्गदर्शन होण्यासाठी पालिकेच्यावतीनेही लवकरच पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन शिबिराचे पालिकेत आयोजन करण्यात येणार आहे. सोमनाथ केकाण, सहाय्यक नगररचना संचालक