टीम लोकसत्ता
नवी मुंबई: विविध प्रकारच्या अडचणींवर मात करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाने आर्थिक वर्ष २०२२ – २३ मध्ये ६३३.१७ कोटी रकमेचे उत्पन्न जमा केले आहे. मागील वर्षीपेक्षा हे उत्पन्न १०७.१७ कोटींनी अधिक असून मालमत्ता कर विभागाने वर्षभरात जमा केलेल्या महसूलाचा हा आत्तापर्यंतचा विक्रम आहे.
मागील वर्षी महानगरपालिकेने ५२६ कोटी इतका मालमत्ता कर जमा केला होता. यावर्षी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पावले टाकत मालमत्ताकर विभागाने अतिरिक्त आयुक्त तथा मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली योग्य उपाययोजना राबवत ६३३.१७ कोटी इतकी रक्कम जमा केलेली आहे.
आणखी वाचा- उरण-खारकोपर लोकलचा मुहूर्त १५ एप्रिलला? सोमवारी होणार चाचणी
या उल्लेखनीय कामगिरीबदल आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मालमत्ताकर विभागाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले असून महानगरपालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत.मागील दोन वर्षाचा करोना प्रभावित काळ आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत मालमत्ताकर थकबाकीच्या दंडात्मक रकमेवर ७५ टक्के सवलत देणारी अभय योजना लागू करून नागरिकांना दिलासा दिला होता. पुढे १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत ही सवलत ५० टक्के करण्यात आली होती. या अभय योजनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत १३० कोटीहून अधिक रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा केली.
करनिर्धारणा न झालेल्या एमआयडीसी व निवासी क्षेत्रातील मालमत्तांना कराच्या जाळ्यात आणण्याचे नियोजनबद्ध काम करण्यात आले. याशिवाय मोठ्या प्रमाणात थकबाकी असणाऱ्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करून अधिकाधिक महसूल वसूल करण्याकडे बारकाईने लक्ष देण्यात आले. याचाच परिणाम स्वरूप म्हणून मागील वर्षीपेक्षा यावर्षी १०७.१७ कोटी इतका अधिकचा मालमत्ता कर जमा करण्यात विभागाला यश आले. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना कर भरणा सुलभ व्हावा म्हणून महानगरपालिकेची सर्व कार्यालये मालमत्ता कर भरण्यासाठी खुली ठेवण्यात आली होती. ३० मार्च रोजी एका दिवसात १५ कोटी रक्कमेचा मालमत्ताकर भरणा करण्यात आला.
आणखी वाचा- उरण-करंजा रस्त्याची वाट बिकट, पाण्याबरोबर रस्ता समस्याही गंभीर
तर ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही १८.९२ कोटी इतकी रक्कम मालमत्ता करापोटी जमा झालेली आहे.नागरिकांची ही सकारात्मक भूमिकाच नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा आधार असून मालमत्ता करापोटी जमा होणारी रक्कम ही दर्जेदार सेवासुविधा पुर्तीसाठी वापरली जाते याची जाणीव ठेवून नवी मुंबईकर नागरिकांनी विक्रमी मालमत्ता कर वसुलीसाठी जे योगदान दिले त्याबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत.
पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे यंदा मालमत्ता कर अधिक वसूल करण्यात आला आहे .नागरिकांनी पालिकेच्या आवाहानाला चांगला प्रतिसाद दिल्यामुळेच यंदा गतिवर्षीपेक्षा १०७.१७ कोटी एवढा अधिक मालमत्ता कर वसूल करण्यात आलेला आहे. ही आतापर्यंतची महापालिकेतील विक्रमी वसुली आहे .मालमत्ता करापासून जमा झालेला पैसा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्यात येईल व नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. -राजेश नार्वेकर, आयुक्त नवी मुंबई महापालिका