Navi Mumbai NCB Raid : अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) सुफियान खान या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. एनसीबीसह मुंबई आणि ठाणे पोलीस अनेक महिन्यांपासून सुफियान खानच्या मागावर होते. बरेच दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर तो एनसीबीच्या गळाला लागला आहे. २६ जून रोजी एनसीबीने मुंबईत ३१.५ किलो मेफेड्रॉन जप्त केलं होतं. त्या धाडीत एनसीबीला सुफियान खानविषयी बरीच माहिती मिळाली. त्यानंतर एनसीबीने अधिक आक्रमकपणे त्याचा शोध घेतला. मात्र तो सतत लपण्याचं ठिकाण व फोन नंबर बदलत होता. त्यामुळे त्याचा शोध घेणं अवघड झालं होतं. मात्र एनसीबीने त्याला १५ जुलै रोजी वाशी (नवी मुंबई) येथील एका लॉजवर धाड टाकून अटक केली.
सुफियान खान सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. सुफियान खान हा ड्रग्ज सिंडिकेटमधील महत्त्वाचा सदस्य असून तो शिवडी येथून अंमली पदार्थांची तस्करी करतो. एनसीबी या टोळीकडून होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अधिक तपास करत आहे.
हे ही वाचा >> नवी मुंबई : टॉवरच्या आडून उद्यानांवर घाला? गिळंकृत झालेली उद्याने मिळविण्यासाठी महापालिकेची धडपड
सुफियान खानला पकडण्यासाठी एनसीबीची वाशीमधील लॉजवर धाड
दरम्यान, सुफियान खान याला अटक केल्यानंतर एनसीबीने आज त्याला न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून त्याला २० जुलैपर्यंतची एनसीबी कोठडी सुनावली आहे. सुफियान खानवर मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून एनसीबी आणि पोलीस त्याच्या मागावर होते. सोमवारी एनसीबीला त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली की सुफियान खान हा वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील एका लॉजमध्ये थांबला आहे. तो खोलीत झोपलेला असताना एनसीबीने लॉजवर धाड टाकली आणि त्याला अटक केली.