नवी मुंबई : शहरात नव्या बांधकामांबरोबरच पुनर्विकासातील कामांबाबत मोठ्या प्रमाणात शहरात स्फोट घडवण्यात येत असून या स्फोटांमुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरत आहे. मंगळवारी दुपारी नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला स्थानकालगतच पिरॅमिड सेंट्रिया या नव्याने होऊ घातलेल्या टॉवरच्या कामासाठी स्फोट घडवत असताना पदपथावरून आपल्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असलेल्या गरोदर महिलेच्या डोक्यात स्फोटामधील दगड पडून मोठी दुखापत झाली. त्यात महिलेच्या डोक्याला बारा टाके पडले आहेत. तिच्यावर नेरुळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात बांधकामांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या स्फोटांमुळे बसणारे हादरे व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लोकसत्ताने सातत्याने मांडला असून याचे गांभीर्य संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे. या घटनेबाबत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नेरुळ पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा…“बील न भरल्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे”, असा फोन आला तर विश्वास ठेवू नका, फसवणूक होऊ शकते 

शहरात पुनर्विकासाचे तसेच नव्याने बांधकाम होऊ घातलेल्या बहुमजली इमारतींची कामे वाशी व सीवूड्स, नेरुळ विभागात मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. बांधकाम प्रकल्पांच्या आजुबाजूच्या नागरिकांना वेळीअवेळी होत असलेल्या या मोठ्या मोठ्या मशनरींच्या आवाजामुळे ध्वनी व वायू प्रदुषण होत आहे. याबाबत पालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सीवूडस सेक्टर ४६ परिसरातही अद्यापही रात्रीची धडधड चालूच असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे या नव्या इमारतींच्या खोदकाम तसेच ब्लास्टिंगबाबतची परवानगी संबंधित विविध विभागांनी देताना योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नेरुळ रेल्वेस्थानकाजवळ जी घटना घडली त्या ठिकाणी महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहाय्यक नगररचना संचालक सोमनाथ केकाण, नेरुळ विभाग अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. शहरातील वाढत्या ब्लास्टिंगच्या व तक्रारींच्या अनुषंगाने पालिकेने नुकतीच एक कमिटी स्थापन करुन त्याची नियमावली निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. परंतू तोपर्यंत शहरातील नागरीकांचा जीव मात्र या ब्लास्टिंगमुळे टांगणीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा…पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

शहरात ब्लास्टिंगची परवानगी कोण देते?

नवी मुंबई शहरात विविध विभागांत मोठमोठी टॉवरची कामे सुरु आहेत. या कामांच्या ठिकाणी पार्किंग सुविधेसाठी भूखंडाच्या खाली खोदकाम करताना करावयाच्या ब्लास्टिंगची परवानगी ही केंद्र शासनाच्या पेट्रोलियम आणि एक्सप्लोसिव्हस सेफ्टी ऑनायजेशन यांच्याकडून दिली जाते. नेरुळ येथील दुर्घटना घडली त्या ठिकाणीही या संस्थेने मे. शिवम एन्टरप्रायजेस या कंपनीला ब्लास्टिंगची परवनागी दिल्याचे समोर आले आहे. परंतू शहरात सुरु असलेल्या विविध कामांबाबत सर्वच विकासकांकडून अशा परवानग्या घेतल्या आहेत का याची पालिका तसेच पोलिसांनी खात्री करणे आवश्यक आहे. नेरुळ रेल्वेस्थानकाजवळ च्या बांधकामाच्या ठिकाणी अशा प्रकारे खोलवर स्फोट घडवले जातात.

नेरुळ पोलीस गुन्हा दाखल करणार

माझी पत्नी छोट्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना नेरुळ स्थानकाजवळ सुरु असलेल्या कामातील ब्लास्टिंगचा दगड डोक्यात पडून तिला १२ टाके पडले आहेत. पोलिसांनी माझ्या गरोदर पत्नीचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी संबंधितांवर योग्य कारवाई करुन गुन्हा दाखल करायलाच हवा. – हरिश कासुर्डे, जखमी महिलेचा पती

हेही वाचा…नवी मुंबई : कामगाराने मित्राच्या मदतीने केली चोरी 

स्थळ पाहणी करतात का?

सीवूड्स सेक्टर ४६ परिसरात डेल्टा तसेच गामी या बांधकाम व्यावसायिकांच्या बांधकामांमुळे व सततच्या ब्लास्टिंगमुळे शेजारच्या सिडको वसाहतीमधील हजारो कुटुंबिय जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. पार्किंगसाठी खोल ब्लास्टिंग करताना दगड संरक्षक भिंतीबाहेर उडून जवळजवळ ४० फूट उंचीवरुन दगड महिलेच्या डोक्यात पडल्याने ही महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे परवानगी देताना खरेच संबंधित अधिकारी स्थळपाहणी करतात का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेरुळ येथे सुरू असलेल्या इमारतींच्या कामांबाबत सर्वच विभागांच्या नियमानुसार परवानग्या घेतल्या आहेत. खोदकामाबाबत तसेच ब्लास्टिंगबाबतही ज्या कंपनीला काम दिले आहे त्याचीही नियमानुसार परवानगी घेतली आहे. भूखंडाभोवती ३० ते ४० फूट उंचीपर्यंतचे पत्र्याचे संरक्षक कुंपण घातले आहे. दुर्दैवाने ही घटना घडली असून कामाबाबत अधिक खबरदारी घेण्यात येईल. – रमेश पटेल, विकासक, नेरुळ

हेही वाचा…‘मावळ’ मतदारसंघात ‘मनसे’ अजूनही प्रचारापासून दूर

चौकट- नवी मुंबई नेरुळ येथे ब्लास्टिंगच्या कामावेळी दगड उडाल्याने एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला टाके पडले आहेत. तिच्यावर उपचार सुरु आहेत. त्या महिलेचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. – तानाजी भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरुळ

नेरुळ येथील घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली असून या ठिकाणी सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेतली आहे का तसेच ब्लास्टिंगच्या परवानगीबाबत कागदपत्रांचीही पाहणी केली आहे. आवश्यक सर्व परवानग्या असून पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार पालिकेकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. – शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता

हेही वाचा…ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ? 

विकासकांद्वारे सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी संरक्षक भिंतीबाबत खबरदारीची गरज आहे. मुळातच परवानग्यांचा घोळ कायम असून पोलीस, पालिका तसेच केंद्राच्या पेसो या संस्थेमार्फत स्थळ पाहणी करून परवानगी देणे गरजेचे आहे. – प्रवीण खेडेकर, जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना, नवी मुंबई

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai nerul railway station west woman injured by falling stone during construction blast safety concerns raised psg