नवी मुंबई : आजमितीला संतुलित आहारात ज्वारीचा समावेश होत असल्याने ज्वारीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ज्वारीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी ज्वारीच्या दराने प्रतिकिलो ८०-९० रुपयांपर्यंतचा उच्चांक गाठला होता. परंतु एपीएमसीत आता नवीन ज्वारीचे उत्पादन दाखल होत असल्याने दर आवाक्यात आले आहेत. घाऊक बाजारात ज्वारीची प्रतिकिलो ५०-६० रुपयांनी विक्री होत आहे.
बाजारात शुक्रवारी १६४५ क्विंटल दाखल झाली असून चांगल्या प्रतीची ज्वारी ५०-६० रुपयांवर विक्री होत आहे. ज्वारी आवाक्यात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. मात्र मध्यंतरीच्या पावसाने ज्वारीचे नुकसान झाल्याने ३० ते ४० टक्के उत्पादनाला फटका बसला होता. बाजारात ज्वारीची आवक घटल्याने १३ टक्के दरवाढ झाली होती. ज्वारीचा दर प्रतिकिलोला ८० रुपये झाला होता. सोलापूर, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून ज्वारीची आवक होत असते. मात्र सध्या बाजारात सोलापूर येथील आवक होत आहे. फेब्रुवारीमध्ये नवीन ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर एपीएमसीत नवीन ज्वारी दाखल होण्यास सुरुवात होते.
हेही वाचा : दिशाभूल करणारा संदेश पाठविणाऱ्या विरोधात निवडणूक आयोगाची पोलिसांत तक्रार
मागील वर्षी अवकाळी पावसाने ज्वारीच्या उत्पादनाला फटका बसला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने ज्वारीच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र आता बाजारात नवीन ज्वारी दाखवण्यास सुरुवात झाली असून दर आवाक्यात आले आहेत.
हर्षद देढिया (व्यापारी, धान्य बाजार, एपीएमसी)