नवी मुंबई : कोपरी भागातून एका तीन वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. याबाबत माहिती मिळताच तत्काळ हालचाल केल्याने मुलीचा शोध घेण्यात यश आले आहे. तर एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अन्य एक आरोपी अद्याप फरार आहे.

साहिल म्हात्रे असे यातील अटक आरोपीचे नाव आहे. कोपरी सेक्टर २६ येथील पुनीत कॉर्नर या इमारतीलगत एकता नगर झोपडपट्टीत राहणारी तीन वर्षीय मुलगी खेळत असताना तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावत साहिलने अपहरण केले होते. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तीन पथके तयार केली होती. तर अन्य एक पथक तांत्रिक तपास करीत होते. सीसीटीव्ही आणि अपहरण झाले त्यावेळी सदर ठिकाणी असणाऱ्या मोबाइलचे लोकेशन असा तांत्रिक तपास आणि त्याचबरोबर घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांनी दिलेली माहिती असा सर्वांगाने तपास सुरु करण्यात आला होता.

हेही वाचा – सातारा : रोहित शेट्टी यांच्या सिंघम – थ्री चित्रीकरणाने वाईचा गणपती मंदिर परिसर उजळला

या वेगवान तपासाला यश आले आणि कोपरखैरणेतील रा. फ. नाईक चौकात साहिल म्हात्रे याला पोलिसांनी पकडले. त्याला पकडल्यावर पीडित मुलीची सुटका करण्यात आली. अपहरण नेमके का केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?

मनीष सोनी या फरार आरोपीने अटक करण्यात आलेल्या आरोपीस मुलीचे अपहरण करण्यास सांगितले होते. आतापर्यंतच्या तपासात एवढीच माहिती समोर आली आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेत काही धागेदोरे हातात लागले आहेत. मात्र त्याबाबत माहिती देण्यात पोलिसांनी असमर्थता दर्शवली. दुसऱ्या आरोपीला अटक झाल्यावर या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होईल. पोलीस त्याच्या मागावर असून लवकरच त्यालाही अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली.

Story img Loader