नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर चढेच होते. घाऊक बाजारात साठी गाठलेले कांद्याचे दर आता आवाक्यात येत आहेत. घाऊक बाजारात आधी जुना कांदा प्रतिकिलो कांदा ५०-६० रुपयांवर होता. मात्र आता जुना कांदा तुरळक असून नवीन कांदा अधिक प्रमाणात दाखल होत आहे. त्यामुळे नवीन कांद्याच्या दरात प्रतिकिलो १०-१५ रुपयांनी घट झाली आहे.
घाऊक बाजारात नव्या कांद्याची २०-३० रुपयांना विक्री होत आहे. एपीएमसी बाजारात उन्हाळी आणि पावसाळी अशा दोन कांद्याचा हंगाम असतो. नोव्हेंबरमध्ये पावसाळी नवीन कांदा दाखल होत असतो, मात्र परतीच्या पावसाने राज्यातील नवीन कांद्याच्या उत्पादनावर पाणी फेरले होते. त्यामुळे नवीन कांद्याचा हंगाम लांबला आणि जुने कांदे वरचढ ठरत होते. परिणामी कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती.
हेही वाचा – मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर चढेच होते. जुना कांदा घाऊक बाजारात प्रतिकिलो ७० रुपयांपर्यंत गेला होता. तर नवीन कांदे ही वरचढ ठरत होते. नवीन कांदा ५०-५५ रुपयांनी विक्री होत होता. मात्र बाजारात राज्यातील नवीन कांद्याची आवक वाढली आहे. नवीन कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने दर गडगडत आहेत, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे.