नवी मुंबई : स्पोर्ट अथाॅरिटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने खेलो इंडिया वुमन्स पिंच्याक सिलॅट लिग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन क्राईस्ट अकॅडमी स्कूल, कोपरखैरणे येथे २६ ते २७ ऑगस्टला करण्यात आले होते. या स्पर्धेत नवी मुंबईच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या स्पर्धा सर्व वयोगटातील मुलींसाठी घेण्यात आल्या असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील ५३५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे सांघिक चषक पद, २५ सुवर्ण, ५ रौप्य, १४ कांस्य सर्वाधिक पदकासह नवी मुंबई संघाने पटकावले. त्याप्रमाणे द्वितीय क्रमांकाच सांघिक चषक पद ११ सुवर्ण, ९ रौप्य, १५ कांस्य पदकासह सांगली संघाने पटकावले आणि तृतीय क्रमांकाचे चषक पद १० सुवर्ण, ८ रौप्य, १३ कांस्य पदकासह पुणे ग्रामीण संघाने पटकावले. किशोर येवले यांनी महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव जी. शिरगावकर यांचा सत्कार करून पिंच्याक सिलॅट खेळाचा समावेश गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये झाल्याची माहिती दिली.
या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू जास्तीत जास्त पदके मिळवून देतील, असे शिरगावकर यांना सांगितले. त्याचप्रमाणे पिंच्याक सिलॅट खेळाला देशातील १५ राज्यांच्या राज्य ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे. पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता नसल्यामुळे महाराष्ट्र संघ मागील ११ वर्ष अव्वल स्थानी असून सुद्धा महाराष्ट्रातील खेळाडूंना शासनाच्या नोकर भरतीचा आणि योजनांचा लाभ मिळत नाही. त्यासाठी पिंच्याक सिलॅट खेळाला महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता देऊन खेळाडूंना योग्य न्यान मिळवून द्यावा अशी विनंती नामदेव शिरगावकर यांच्याकडे करण्यात आली. त्याचप्रमाणे पिंच्याक सिलॅट या खेळाला खेलो इंडिया वुमन्स लिगमध्ये सामील करून पिंच्याक सिलॅटच्या महिला खेळाडूंना खेळण्याची मोठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली.
हेही वाचा : रस्त्यावरील बेकायदा गॅरेजवर थेट गुन्हे दाखल, दोन दिवसांत चार गुन्हे दाखल
नामदेव शिरगावकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. पिंच्याक सिलॅट खेळाविषयी बोलताना, या खेळाचा गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये समावेश झाला आहे. पिंच्याक सिलॅट खेळ हा इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार असून टॅडिंग (फाईट), तुंगल (सिंगल काता) , रेगु (ग्रुप काता), गांडा (डेमी फाईट), सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारात खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये केला आहे. या खेळाला युवक कल्याण आणि किडा मंत्रालय, भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व एशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. या खेळाचा समावेश गोव्यात होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. या खेळामध्ये मागील ११ वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे.