लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई: मुंबईतील मानखुर्द, गोवंडी तसेच चेंबूर भागांतील काही गणेश मंडळे गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी वाशी सेक्टर आठ येथील तलाव परिसरात मोठ्या संख्येने येऊ लागली आहेत. वाशी, जुईनगर तसेच आसपासच्या भागांतील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची या ठिकाणी रीघ लागत असल्याने मुंबईतील अतिरिक्त मंडळांचा भार आता स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना पेलवेनासा झाला आहे. यामुळे मुंबईतील मंडळांनी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी वाशीच्या दिशेने येऊ नये, असे आवाहन करत नवी मुंबई पोलिसांनी टोल नाका परिसरातच यासाठी आवश्यक सूचना यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेमार्फत वाशीसह वेगवेगळ्या उपनगरांमधील तलावांच्या ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. यासाठी महापालिका सुसज्ज अशी यंत्रणा उभी करते. वाशी सेक्टर आठ येथील तलावाच्या ठिकाणी वाशी तसेच आसपासच्या उपनगरांमधील गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतींची संख्या मोठी असते. असे असताना गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी मानखुर्द, गोवंडी तसेच चेंबूरची काही मंडळे मूर्ती विसर्जनासाठी येऊ लागली आहेत.
हेही वाचा… अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओची करडी नजर; एका दिवसात तब्बल १४ वाहनांवर कारवाई
वाशी जुन्या खाडीपुलावरून या मंडळांच्या मिरवणुका वाशीच्या दिशेने येतात आणि जागृतेश्वर मंदिरामागील रस्त्यावरून विसर्जन तलावाच्या ठिकाणी पोहोचतात. या मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे स्थानिक यंत्रणांवर भार पडू लागला असून या मंडळांनी वाशीच्या तलावावर येऊ नये, असे आवाहन केले आहे.
पोलिसांकडून विसर्जन यंत्रणेचा आढावा
गणेश विसर्जन रात्री बारापूर्वी संपवावे असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी मंडळांना केले आहे. सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन हे वाशी आणि कोपरखैरणे तलावात होते. येथे विसर्जन होणाºया सार्वजनिक गणपती मंडळात मुंबईतील अनेक मंडळांचा समावेश असतो. या वर्षी मात्र मुंबईतील गणेश मंडळांना वाहतूक कोंडीच्या कारणास्तव वाशीत येण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. जुन्या खाडीपुलावरून मुंबई परिसरातील गणेश मंडळे वाशीत येत होती.