पनवेल  : खारघर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणात नवी मुंबई पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने तीन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पावणेचार लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. सोमवारी पहाटे दलाराम चौधरी यांच्या सेक्टर ३४ येथील धनलक्ष्मी मोबाईल शॉप या दुकानात चोरी झाली होती.

चोरट्यांनी पहाटे सव्वा चार वाजता दुकानाचे शटर खालून उचकटून मोबाईल दुकानातील ४ लाख ३० हजार रुपयांचा माल चोरल्याची तक्रार दुकान मालकाने खारघर पोलीस ठाण्यात केली होती. तीन युवक तोंडाला कपडा बांधून दुकानात शिरल्याचे चौधरी यांनी लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले होते.

हेही वाचा…दोन कोटी रुपयांचे एमडी जप्त… नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई…

घटनास्थळी सोमवारी सकाळी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी भेट देऊन चोरी करण्यासाठी चोर ज्या मार्गाने आले त्या मार्गातील सर्व सीसीटिव्ही तपासण्याच्या सूचना गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती कक्षातील पोलीसांना दिल्या होत्या. २४ तास सलग पोलीस या चोरांचा शोध सीसीटिव्ही कॅमेरामध्ये घेत असताना ३ युवकांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. या तीनही युवकांची चौकशी केल्यावर हे तिघंही विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे पोलीसांना समजले.

हेही वाचा…भाजपा कडून देशाच्या लोकशाही आणि संविधानाला धोका कायम, उरणच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सतिश भोसले, पोलिस उपनिरिक्षक राहुल भदाने, पोलिस हवालदार अनिल यादव, शशिकांत शेंडगे, संजय राणे, निलेश किंद्रे, पोलिस नाईक सचिन टिके, महेश अहिरे, सतिश चव्हाण, पोलिस शिपाई अशोक पाईकराव यांच्या पथकाने या तीन संशयीतांना खारघर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा ३,८२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.