पनवेल : कोट्यवधी रुपयांच्या बॅंक फसवणूकीप्रकरणी तळोजा येथील तुरुंगात न्यायालयीन बंदी असलेल्या कपील आणि धीरज वाधवान बंधूंना वैद्यकीय सुविधा देण्यात आली होती. मात्र वैद्यकीय सुविधेच्या नावाखाली मुंबई येथील के. ई. एम आणि जे. जे. रुग्णालयाच्या आवारात त्यांच्या खासगी व्यक्तींसोबत भेटीगाठीचे प्रकरण उघड झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सात पोलिसांवर मंगळवारी रात्री निलंबनाची कारवाई केली. 7 आणि 9 ऑगस्टला कपील आणि धीरज वाधवान यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीसांवर निष्क्रीय पोलीस असल्याचा ठपका ठेऊन ही कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये एका उपनिरिक्षकाचा समावेश आहे.
पोलीस उपनिरिक्षक आशुतोष देशमुख, हवालदार विशाल दखणे, शिपाई सागर देशमुख, महिला शिपाई प्राजक्ता पाटील, हवालदार रविंद्र देवरे, शिपाई प्रदीप लोखंडे, महिला शिपाई माया बारवे अशी कारवाई केलेल्या पोलीसांची नावे आहेत. वाधवान बंधूंवर 34 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तळोजा येथील मध्यवर्ती तुरुंगात मागील अनेक महिन्यांपासून न्यायालयीन बंदी म्हणून वाधवान बंधू आहेत. त्यांची प्रकृती वारंवार बिघडते आणि कारागृहातील डॉक्टर त्यांना मुंबईच्या सरकारी रुग्णालयात जाण्याची मुभा देतात. त्या सरकारी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरांच्या भेटीनंतर पोलीस बंदोबस्तामध्ये काहीक्षण बंदींकडे कानाडोळा करण्यासाठी चिरीमीरी दिली जाते.
हेही वाचा : नवी मुंबई ते गोवा महामार्गाला जोडणाऱ्या दिघोडे रस्त्यावर कोंडी, नियमबाह्य कंटेनर कोंडीचा वाढता परिणाम
परंतू मागील अनेक महिन्यात वाधवान यांनी कोणाकोणाला कितीवेळा कारागृहातून पत्रे लिहिली, पत्र लिहील्यानंतरच त्यांना आजारपण कसे ओढावले. तुरुंगातील डॉक्टरांनी वाधवान बंधूंनी आजारपणाची तक्रार केल्यानंतर त्यांना लगेच सरकारी मुंबईच्या रुग्णालयात वारंवार कसे जाऊ दिले. याच तुरुंगातील डॉक्टरांनी इतर बंदींना या पद्धतीने मुंबईच्या सरकारी रुग्णालयात जाऊ दिले का? असे अनेक प्रश्न वाधवान बंधूंना पोलीसांनी केलेल्या मदतीच्या प्रकरणानंतर विचारले जात आहेत. 7 व 9 ऑगस्टला झालेल्या या खासगी बैठकांमध्ये वाधवान बंधू कोणाकोणाला भेटले, त्यांनी लॅपटॉपवर कोणती कामे केली, त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात कोणत्या महागड्या मोटारी आल्या, याचा शोध पोलीसांनी घेतल्यावर 34 हजार कोटी रुपयांच्या फसवणूकीचा छडा लागण्यास मदत होईल अशी चर्चा पोलीस दलात आहे.
हेही वाचा : जगातील अत्याधुनिक बंदरातील रस्ते चिलखमाती आणि खड्डेमय; प्रवासी वाहने, नागरिक आणि मालवाहतूकदारही त्रस्त
सध्या नवी मुंबई पोलीस दलातील स्वच्छता मोहीम पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी हाती घेतली आहे. आठ दिवसांपूर्वी उरण येथील बनावट दामदुप्पट योजनेतील आरोपींना सहकार्य केल्याने तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सात निष्क्रीय पोलीसांना मंगळवारी रात्री निलंबित करण्याचे आदेश दिले. चुकीला माफी नाही, या उक्तीने सध्या पोलीस दलाचे काम सुरू आहे.