नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस कामकाजात डिजिटलायझेशनवर भर आहे. हे डिजिटलायझेशन केवळ अंतर्गत कामकाजात नव्हे तर तपास कामातही सुरू केले आहे. आता समन्ससुद्धा पाठवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. ‘आय बाईक’, ‘यथार्थ’ प्रणालीसारखी तपास पद्धत राज्यात पहिल्यांदाच वापरली जात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ‘एम. पोलीस पद्धती’ अर्थात ‘मिशन कन्व्हिक्शन’ याखाली सर्व पद्धतींचा वापर केला जात आहे. वर्षभरात एकूण गुन्ह्यांच्या ७३ टक्के गुन्हे उकल करण्यात यश आले आहे. तर दोष सिद्धीत २०२२च्या तुलनेत २०२३ मध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
‘इ पेरावी’ पद्धतीमध्ये समन्स पाठवण्यासाठी ई-मेल वा समाजमाध्यमाचा वापर केला जातो. २०२३ मध्ये या पद्धतीने ७ हजार ३९७ ई-समन्सद्वारे १९ हजार २४४ साक्षीदारांना समन्स पाठवण्यात आले. यापैकी १४ हजार १०५ साक्षीदार न्यायालयात हजर झाले होते. आय बाईक ही पद्धत सुरू केली. या पद्धतीनुसार गुन्ह्याच्या ठिकाणी पुरावे गोळा करण्यासाठी दुचाकीवर गेलेले प्रशिक्षण घेतलेले एक पथक केवळ पुरावे गोळा करतात. यातील पुराव्याची तपासणी लॅबमध्ये केली जाते. अशा पद्धतीने २०२३ या वर्षात ३ हजार ८८६ गुन्ह्यामध्ये १ हजार ३८ आणि अपमृत्यू मध्ये १ हजार ३८ प्रकरणात १७३ ठिकाणी आय बाईकचा वापर करण्यात आला.
हेही वाचा : खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील हलगर्जीपणाबाबतच्या याचिकेची सूनावणी पुढील तारखेला
तपास कामांचा वेग वाढला
सायबर गुन्ह्यांची संख्या पाहता फसवणूक झालेली व्यक्ती केवळ नोंद असावी म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार देत तपास तर लागणारच नाही या मानसिकतेत पीडित होते. मात्र नेरुळ येथे सायबर पोलीस ठाणे स्थापन केल्यावर तपास कामाचा वेग कमालीचा वाढला. त्यामुळेच तपासकामी आलेल्या गुन्ह्यातील ४३.४५ कोटी फसवणूक रकमेपैकी ३३.८३ कोटी रक्कम गोठवण्यात यश आले.
हेही वाचा : कळंबोलीच्या लोखंड बाजारात चोरीचे सत्र सूरुच; ७ लाख ३३ हजारांचा स्टेनलेस स्टील गोदाम फोडून लुटले
“नवी मुंबई पोलीस दलाने कात टाकली असून त्याचे आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशन केले जात आहे. त्यामुळे वेळ , पैसा, आणि मनुष्यबळाची बचत होत आहे. तपास कामकाज करताना आधुनिक पद्धतीचा वापर सुरू केल्याने गुन्हे उकल, दोष सिद्धीत लक्षणीय वाढ झाली आहे. दोष सिद्धीत वाढ करण्यासाठी सर्व योग्य पद्धतींचा अवलंब केला जाईल.” – मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई</p>