|| शेखर हंप्रस
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांची कामगिरी राज्यातील इतर आयुक्तालयांच्या तुलनेत चांगली असे म्हटले जाते. त्याचबरोबर गुन्हे उकल आणि दोष सिद्धीचे प्रमाणही इतर आयुक्तालयांच्या तुलनेत चांगले म्हटले जाते. असे असले तरी -हाय प्रोफाइल- म्हटल्या जाणाऱ्या हत्यांचा उलगडा करण्यात मात्र नवी मुंबई पोलिसांना कायम अपयश आले आहे.
नवी मुंबई पोलिसांची वार्षिक पत्रकार परिषद पार पडली. यात गुन्हेगारीचा आलेख उंचावल्याचे पोलीस आयुक्तांनी मान्य केले असले तरी गुन्हे उकल चांगली असल्याचे सांगत गुन्हेगारीला कारणीभूत वाढती लोकसंख्या असल्याचेही सांगण्यात आले.
२०२० मध्ये ४१ हत्या झाल्या तर २०२१ मध्ये ४५ हत्या झाल्या. यात २०२० मध्ये गुन्हे उकल प्रमाण ९० टक्के तर २०२१ मध्ये ९३ टक्के असल्याची पोलिसांनी माहिती दिली. मात्र नवी मुंबईतील हाय प्रोफाइल समजल्या जाणाऱ्या हत्येचा उलगडा होत नाही असा आजपर्यंतचा अनुभव आहे. यातील बहुतांश फायली बंद करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
शहरात १९९७ साली नगरसेवक शरद सावंत यांची हत्या झाली. शांत म्हणून ख्याती असलेल्या शहरात भरदिवसा झालेल्या या हत्येने मोठी खळबळ उडाली होती. त्याचा छडा अद्याप लागलेला नाही. त्याचबरोबर २००९ मध्ये कोपरखैरणे येथे डॉ. नेत्रा यांच्या हत्येचाही उलगडा झालेला नाही. बांधकाम व्यावसायिक आणि नगरसेवक अनंत काळे यांचीही गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. लवकरच आरोपी पिंजऱ्यात असेल अशी वल्गना पोलिसांनी केली. मात्र अद्याप आरोपी पकडण्यात यश आलेले नाही. ९ नोव्हेंबर २००८ मध्ये देवा चौगुले यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या आरोपींचा शोध अद्याप लागलेला नाही. या हत्येतील काही जणांना अटक केली. मात्र कुठलाही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करण्यात आली.
१२ जुलै २०१३ मध्ये या शहरातील सर्वात निर्घृण हत्या झाली. घणसोली येथील एका एटीएमचे सुरक्षारक्षक असलेले सूर्यकांत महाडिक यांची हत्या झाली. त्यांच्या शरीरावर ५० पेक्षा अधिक वार झाल्याचे शवचिकित्सेत आढळून आले होते. ही हत्या एटीएम लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी केली होती. महाडिक यांनी त्याला विरोध केल्याने हत्या करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसून आला होता. तरीही पोलीस अद्याप त्याच्यापर्यंत पोहचले नाहीत. यातील बहुतांश फायली बंद करण्यात आल्या आहेत वा तपास सुरू आहे या शीर्षकाखाली आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
याबाबत गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांना विचारणा केली असता पूर्ण माहिती घेऊन या प्रकरणांबाबत प्रतिक्रिया देता येईल असे त्यांनी सांगितले. याचबरोबर सकाळी कार्यालयात येत असताना २०१३ मध्ये एस के लाहोरिया या विकासकाची हत्या करण्यात आली होती. यातील आरोपीला अटक केली मात्र नंतर हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यावेळी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. तसेच २०१२ मध्ये एनआरआय या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या संध्या सिंग यांची हत्या झाली होती. त्याचाही छडा न लागल्याने हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.