नवी मुंबई : घरफोडी, दरोडा, फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना ४ वर्षापासून गुंगारा देत होता. गुन्हा केल्यावर आपल्या काही साथीदारांना अटक केल्याचे कळताच, त्याने पश्चिम बंगाल मधील मूळ गाव गाठले. मात्र नवी मुंबई पोलीस तेथेही पोहचले. त्याही ठिकाणी पोलिसांना त्याने गुंगारा दिला. अखेरीस तो पोलिसांच्या सापळ्यात अडकला व पोलिसांनी त्याला अटक केली.
मिनू उर्फ अल्लाउद्दिन नेसू मोहम्मद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने ५ ऑक्टॉबर २०१९ मध्ये आपल्या सात आठ साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकला होता. या साथीदारांच्या पैकी मोहम्मद रियासत नासिर अन्सारी, खुर्शीद मोहम्मद अस्लम शेख, अल्ताफ उर्फ मेहताब अब्बास शेख, अब्दुल सलीम उर्फ सोनू हकीम खान, शरीफ असलम शेख, यांना घटना घडल्यावर तिसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली तर सहावा आरोपी मलिक उस्मान गणी शेख याला १८ जुलै २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. यातील सूत्रधार मिनू उर्फ अल्लाउद्दिन हा मात्र फरार होता. आपल्या साथीदारांना अटक झाल्याची माहिती मिळताच त्याने पश्चिम बंगाल मधील मालदा जिल्ह्यातील आपले मूळ गाव गाठले . पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेळोवेळी तो जागाही बदलत होता.
हेही वाचा: उरण: संविधान दिनानिमित्त घारापुरी बेटावर राबविण्यात आली स्वच्छता मोहीम
नवी मुंबई पोलिसांना त्याचा ठावठिकाणा मिळताच पोलिसांनी पश्चिम बंगाल गाठले. मात्र तेथे तो पोलिसाना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला. दरम्यान रविवारी नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात असलेल्या तीन टाकी चौकात तो असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड यांना मिळताच त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना दिली. त्यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस हवालदार सूर्यवंशी, हे पथक आरोपीला पकडण्यासाठी रवाना केले. गायकवाड यांच्या मार्गदर्शखाली सापळा रचून त्याला अटक करण्यात आली .अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिली.
पाच ऑक्टोबर २०१८ रोजी सदर आरोपीने त्याच्या साथीदारांच्यासह एका सोन्याची विक्री करणाऱ्या इसमावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पाळत ठेऊन पाठलाग केला. तो इसम नेरुळ रेल्वे स्टेशन येथे उतरून एमटीएनएल कार्यालय रस्त्यावरून पायी जात असता त्याच्या डोक्यात दगड मारून त्याच्याकडील ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग जबरीने घेऊन गेले होते. या बाबत ६ तारखेला गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी अट्टल गुन्हेगार आहे. या पूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या कडून दरोड्यातील १३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते.