नवी मुंबई : पुण्यातून पनवेलमध्ये येऊन कार चोरणाऱ्या एका सराईत आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी आळंदी येथे सापळा रचून अटक केली आहे. आरोपीच्या अटकेने चार गुन्ह्यांची उकल झाली असून त्याच्या विरोधात यापूर्वीही पुणे परिसरात १४ गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपीला २ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रेवन बिरू सोनटक्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पनवेलमधील कोळखे गाव येथील एसबी गॅरेजसमोर पार्क केलेली किशन शिवराम मलगी यांची होंडा सिटी गाडी १५ एप्रिलला चोरी झाली होती. या संदर्भात गुन्हा नोंद झाल्यावर तपास करीत असताना सी.सी.टी.व्ही. चित्रण तपासले असता आरोपीने गुन्ह्यातील वाहन चोरी करण्यासाठी वापरलेली एक्स.यू.व्ही. मोटार कार घटनास्थळी शेजारी उभी केल्याचे दिसून आले. गुन्ह्यात वापरलेली एक्स.यू.व्ही. मोटार कार जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त केल्यानंतर त्याच्या मालकाचा तपास केल्यावर ही दुचाकी खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झाली असून, त्या बाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद असल्याचे समोर आले. या बाबत घटनास्थळी तांत्रिक तपास करून अशा प्रकारच्या गुन्ह्याची कार्यपद्धती असणारे गुन्हेगारांचे अभिलेख प्राप्त करून सदरचा अभिलेख व घटनास्थळावरील तांत्रिक तपासामधील प्राप्त माहितीची सांगड घालून तपास केला असता आरोपी रेवन बिरू सोनटक्केचे नाव समोर आले.
हेही वाचा >>>नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आग
आरोपी हा अतिशय सराईत असल्याने तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे आव्हानात्मक झाले होते. गोपनीय सूत्रांमार्फत सदर आरोपी २७ एप्रिलला आळंदी येथे येणार असल्याची बातमी तपास पथकास प्राप्त झाली. या माहितीच्या आधाराने वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ व शिताफीने कारवाई करून केळगाव, आळंदी येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचरपूस करून त्यानेच गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यापूर्वी आरोपीने पनवेल शहर पोलीस ठाणे- वाहन चोरी, खांदेश्वर, चाकण आणि देहूरोड पोलीस ठाणे येथील घरफोडी या चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच आरोपीच्या नावावर या पूर्वी १० गुन्ह्यांची नोंद आहे. हे सर्व गुन्हे त्याने पुणे आणि परिसरात केलेले आहेत.