नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस भरतीतील दुसरा महत्वाचा टप्पा असलेली लेखी आज (ता. ७) पार पडली. पावसाचा अंदाज बघता सुटसुटीत असणारे परीक्षा केंद्र म्हणून वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात सादर परीक्षा पार पडली. पोलीस शिपाई संवर्गातील १८५ पदांसाठीची सदर परीक्षा घेण्यात आली.
नवी मुंबई पोलीस विभागातील शिपाई संवर्गातील १८५ पदांची परीक्षा आज पार पडली असून सदर परीक्षेसाठी १ हजार ३९९ पुरुष तर ४४३ महिला परीक्षार्थी होत्या. मात्र त्यात १० पुरुष आणि २ महिला गैर हजर राहिल्या उर्वरित १ हजार ३८९ पुरुष आणि ४४१ महिलांनी सदर परीक्षा दिली. हि परीक्षा सिडको प्रदर्शनी केंद्रात १० ते साडे अकरा दरम्यान झाली असली तरी प्रत्यक्षात सकाळी ७ वाजता उपस्थित राहण्याचे निर्देश परीक्षार्थी विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्यामुळे सकाळी साडे सहा पासूनच परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थी दिसून येत होते.
हेही वाचा : मुसळधार पावसामुळे पनवेलमधील सखल भागातील घरांमध्ये फूटभर पाणी
२७ जूनला मैदानी परीक्षा संपल्यानंतर ५ हजार ९८४ मधून १ हजार ८४२ पात्र उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडण्यात आले. यामध्ये १३९९ पुरुष आणि ४४३ महिलांचा समावेश होता. मैदानी चाचणी प्रमाणे लेखी परीक्षेवेळी उमेदवारांसाठी मोफत अल्पोपहाराची, खाद्यगृह स्टॉल पोलीस विभाग आणि सेवा भावी संस्थांकडून उभारले गेले होते. त्यामुळे सकाळी सात वाजता हजर झालेल्या परीक्षार्थींनी परीक्षेपूर्वी पोटपूजा केली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाहेरील येणा-या उमेदवारांना रविवारी परिक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी पनवेल, मानसरोवर आणि वाशी रेल्वे स्थानकातून शासकीय वाहनांची सोय नवी मुंबई पोलीसांनी केली होती. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा अशा आधुनिक साधनांची मदत घेण्यात आली होती. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली.