लोकसत्ता टीम

पनवेल : नवी मुंबई पोलीस शिपाई संवर्गातील १८५ पदांसाठीची भरती प्रक्रियेचा दूसरा महत्वाचा टप्पा म्हणजे लेखी परिक्षा रविवारी ७ जुलैला नवी मुंबईतील वाशी येथील ‘सिडको एक्झीबीशन सेंटर’मध्ये होणार आहे. रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या दरम्यान ही परिक्षा होणार असली तरी पात्र उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर सकाळी ७ वाजता उपस्थित राहण्याची सूचना नवी मुंबई पोलीसांतर्फे करण्यात आली आहे. या लेखी परिक्षा केंद्राच्या आत आणि बाहेर सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून उमेदवारांवर बारीक लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. 

नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई या १८५ पदांसाठीची भरती प्रक्रियेसाठी तब्बल ५,९८४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भरती  प्रक्रियेला १९ जूनपासून सूरुवात झाली होती. मात्र पावसामुळे मैदानाची दुर्दशा झाल्यानंतरही पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वामुळे भरती प्रक्रिया राबविणा-या समितीने उमेदवारांना अधिकाधिक सुविधा दिल्यामुळे एकही अनुचित प्रकार या भरती प्रक्रियेमध्ये झाल्याची नोंद नाही. २७ जूनला मैदानी परिक्षा संपल्यानंतर ५,९८४ मधून १,८४२ पात्र उमेदवार लेखी परिक्षेसाठी निवडण्यात आले.

आणखी वाचा-नवी मुंबई : ६ लाख रुपयांचा  एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

यामध्ये १३९९ पुरुष आणि ४४३ महिला तसेच माजी सैनिक ७१ अशा उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी दिली. मैदानी चाचणीप्रमाणे लेखी परिक्षेवेळी उमेदवारांसाठी मोफत अल्पोपहाराची, खाद्यगृहाचे स्टॉल पोलीस विभाग आणि सेवा भावी संस्थांकडून उभारले जाणार आहेत. बाहेरील जिल्ह्यातून येणा-या उमेदवारांना रविवारी परिक्षा केंद्रावर पोहचण्यासाटी पनवेल, मानसरोवर आणि वाशी रेल्वे स्थानकातून शासकीय वाहनांची सोय नवी मुंबई पोलीसांनी  केली आहे. 

लेखी परिक्षेला येताना सोबत प्रवेशपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट साईज दोन फोटो, परिक्षेला येताना कोणतेही डिजीटल साहीत्य उमेदवारांनी सोबत आणू नये, या वस्तू परिक्षा केंद्रावर ठेवण्यासाठी कोणतीही सोय पोलीस विभागाने केली नाही. मैदाणी चाचणी दरम्यान उमेदवारांचे बायोमॅट्रीक ठसे जुळविल्यानंतरच उमेदवारांना परिक्षा केंद्रात प्रवेश मिळेल. ही परिक्षा OMR तंत्रज्ञानावर घेण्यात येणार आहे.