पनवेल : नवी मुंबई पोलिसांनी वर्षभरात २८ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ विविध कारवायांमध्ये जप्त केले. डिसेंबरमध्ये नवी मुंबई पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात केलेल्या कारवाईमध्ये ६ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले असून हे पदार्थ बनविण्यासाठी कारखाना आणि शेतघर भाड्याने घेऊन हा गैरधंदा सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात उजेडात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून या टोळीच्या म्होरक्यांना पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक काम करत होते. तीन डिसेंबरला केलेल्या कारवाईची माहिती गुरुवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सभागृहात पत्रकार परिषदेत नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

हेही वाचा : उरण शहरात भटक्या श्वानांची दहशत वाढू लागली, घोळक्याने लोकांवर करतात हल्ला

पनवेल तालुक्यातील शिरढोण गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर ३ डिसेंबरला संशयित व्यक्ती मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून या संशयिताला पकडले. या व्यक्तीकडून पोलिसांनी ६१.०९ ग्रॅम एमडी पदार्थ जप्त केला. बाजारात या पदार्थाची किंमत ६ लाख १० हजार ९०० रुपये होती. या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून इतर धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा : मित्राशी गप्पा मारणे पडले महागात, रिक्षा गेली चोरीला 

सध्या बाजारात पुरवठा केला जाणारा अंमली पदार्थ परदेशातून येत नसून त्याची निर्मिती येथेच केली जात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी अजून तीन जणांना बदलापूर, ठाणे व खालापूर येथून अटक केली. या आरोपींनी दिलेल्या माहितीनूसार खालापूर तालुक्यातील खोपोली येथील ढेकू गावात बंद पडलेला कारखाना भाड्याने घेऊन तसेच खोपोली पाली मार्गावरील उंबरे गाव येथील एक शेतघर भाड्याने घेऊन या एमडी पदार्थाची निर्मिती केली जात असल्याचे तपासात समोर आले. सुमारे ४५ लाख रुपयांच्या कच्चा मालाने सहा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ बनविण्यासाठी एकाने समाजमाध्यमांवरुन प्रशिक्षण घेतले. तसेच बाजारातून अंमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारे घातक रसायने मिळविली. पोलिसांच्या पथकाला याठिकाणी ३३० लिटर रसायनांचा साठा आणि २५ किलो वजनाची पावडर सापडली.

Story img Loader