नवी मुंबई : शहरातून जाणाऱ्या शीव-पनवेल महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले असून कारचालक तसेच दुचाकीस्वारांना याचा चांगलाच ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतंर्गत येणाऱ्या उड्डाणपुलावर खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही दिवसांपासून शहरात पावसाला सुरुवात झाली असून मागील तीन दिवसांपासून शहरात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे. परंतु, काही दिवसांच्या पावसातच रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या वाशी, सानपाडा, तुर्भे, नेरुळ, उरण फाटा, बेलापूर या ठिकाणांहून जाणाऱ्या महामार्गावर कमी-अधिक प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामध्ये तुर्भे येथील उड्डाणपुलावर खड्डे असून पावसाने काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुन्हा उखडले आहे. पावसाळ्यात याच खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता असल्याने संबंधित आस्थापनांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून बोलावले आणि पोलीस असल्याची बतावणी करून १३ लाखांचा दरोडा टाकला 

शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपुलावर तसेच महामार्गावरील रत्यावर विविध ठिकाणी खड्डे पडल्यानंतर नवी मुंबई महापालिका हद्दीत खड्डे पडल्याची ओरड होते. परंतु यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या खड्ड्यांची जबाबदारी पालिकेची नसून सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याने पालिका याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंगुलीनिर्देश करते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – निवृत्त अधिकाऱ्याच्या खात्यातून अचानक १ लाख ३५ हजार अन्य खात्यात ….फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल 

नवी मुंबई शहरातून महाराष्ट्राच्या विविध भागात जाण्यासाठी शीव-पनवेल महामार्गाचा मोठा वापर होत असून याच मार्गावर खड्डे पडल्याने अजून काही दिवस पावसाला सुरवात झाली असून अद्याप संपूर्ण पावसाळा जायचा असताना सुरुवातीच्या पावसातच खड्डे पडले असल्याची तक्रार वाहनचालक करू लागले आहेत. मागील दोन दिवसांपासून शहरात पावसाला चांगली सुरुवात झाली असली तरी सुरुवातीलाच खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मागील दोन दिवस चांगला पाऊस झाला आहे. शीव-पनवेल महामार्गावर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाची उघडीप होताच तात्काळ खड्डे बुजवण्यात येणार आहे. – कल्याणी गुप्ता, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

शीव-पनवेल महामार्गावर तुर्भेबरोबरच वाशी उड्डाणपूल या ठिकाणीही खड्डे पडले आहेत. अपघात झाल्यानंतर सुधारणा करण्याच्या पूर्वीच संबंधित यंत्रणांनी खड्डे बुजवणे आवश्यक आहे. – दिनेश वर्मा, वाहनचालक

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai potholes on the highway motorists puzzled by potholes on turbhe vashi flyovers on shiv panvel route ssb