नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील अटल सेतू प्रकल्प, विमानतळ, मेट्रो, समृद्धी महामार्ग, रस्ते प्रकल्पांची उभारणी महायुती सरकारच्या काळात झाली असून या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगराचा चेहरामोहरा कसा बदलणार यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर या सर्वांनी गुरुवारी खारघर येथील सभेत भाष्य केले. यानिमित्ताने विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगरातील उमेदवारांनी मतपेरणी केल्याचे चित्र दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात विधानसभा निवडणुकीत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारास सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून जाहीर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारे गुरुवारी खारघर येथील सेंट्रल पार्कजवळील मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. कोकण विभागातील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये महायुतीच्या नेत्यांनी मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख करत या प्रकल्पांच्या माध्यमातून एक प्रकारे मतपेरणी केल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा : खारघर मोदीमय! भाजपचे हजारो कार्यकर्ते खारघरमध्ये दाखल

अटल सेतू प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्याच्या इतिहासात वेगळा अध्याय लिहिला गेला आहे. या प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळाली आहे. विमानतळ प्रकल्पामुळे या भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. औद्याोगिकीकरण, मल्टीमॉडेल कॉरिडॉर, रस्ते जाळे, भुयारी मार्ग, मेट्रो अशा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यामुळे तरुणांना रोजगाराची संधी मिळेल, असे मत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभेत बोलताना व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने कोकणच्या विकासाचे दार खुले केले आहे. औद्याोगिक क्षेत्रात राज्य प्रथम क्रमांकावर असून परकीय गुंतवणूकही राज्यात होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी तळोजामधील ८३ हजार कोटींचा सेमीकंडक्टर चिप उत्पादन प्रकल्प, पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरसाठी २७०० कोटींचा दुहेरी रूळ प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८६ हजार घरांचा महागृहनिर्माणाचा प्रकल्प, अटल सेतूचा प्रकल्प अशा प्रकल्पांचा उल्लेख भाषणात केला.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच

राज्याचे नशीब बदलेल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी २० हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ८० हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदराचे निर्माण केले जात आहे. ५० हजार कोटी रुपयांचा समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल महामार्गामुळे रायगड जिल्हा मुंबईला जवळ येणार आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे डेटा पार्क तळोजामध्ये ३० हजार कोटी रुपये खर्च करून उभारले जात आहे. त्यामुळे रायगड व पनवेल हे ए.आय. आणि डेटा पार्कमुळे नवे केंद्र बनणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे राज्याचे नशीब बदलेल, असे विधान मोदी यांनी केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai prime minister narendra modi speech on development projects vidhan sabha election rally css