Navi Mumbai Two builders murder case: नवी मुंबईतून २१ ऑगस्ट रोजी दोन बांधकाम व्यावसायिक बेपत्ता झाले होते. या प्रकरणाची उकल आता पोलिसांनी केली आहे. एखाद्या चित्रपट किंवा वेब सीरीजची कथा वाटावी, असे ट्विस्ट या घटनेत घडले आहेत. या गुन्ह्यातील दोन्ही बांधकाम व्यावसायिकांची हत्या झाली असून एका व्यावसायिकाने दुसऱ्याची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. मात्र ज्याने सुपारी दिली त्याचाही मृत्यू झाला आहे. ज्यांना सुपारी दिली गेली, त्या मारेकऱ्यांना ठरलेले पैसे देऊ न शकल्यामुळे मारेकऱ्यांनी सुपारी देण्याऱ्याचीच हत्या केल्याचे उघड झाले आहे. मात्र ही नाट्यमय घटना कशी घडली? याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळचे मित्र पण जमिनीच्या वादातून शत्रूत्व

सुमीत जैन (३५) आणि आमिर खानजादा (४०) हे दोघेही नवी मुंबईच्या नेरूळ येथून २१ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाले. दुसऱ्याच दिवशी खालापूर येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत आमिर खानजादा याचा मृतदेह त्याच्याच गाडीत आढळून आला. गाडीमध्ये गोळीबार झाल्याचे निशाण, दोन गोळ्यांची वापरलेली काडतुसे, चप्पल आणि खानजादा वापरत असलेली टोपी आढळून आली. खानजादा यांचा मृतदेह आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेन-खोपोली महामार्गालगतच्या कर्नाळा पक्षी अभयारण्याजवळ सुमीत जैन याचाही मृतदेह आढळून आला. सुमीत जैनच्या एका गुडघ्यावर गोळी झाडल्याची जखम आणि दुसऱ्या पायावर वार केल्याची जखम आढळून आली.

हे वाचा >> नाशिक : पंचवटीत युवकाची हत्या, महिलेकडून दोन लाखाची सुपारी, चार जण ताब्यात

सुमीत जैन आणि नखादे नावाच्या इसमाने मिळून आमिर खानजादा यांचा खून करण्याची योजना बनविली होती. जैन आणि खानजादा दोघेही मित्र होते. त्यांनी अनेक व्यावसायिक प्रकल्पांमध्ये एकत्र काम केले होते. रायगडच्या पाली येथे साडे तीन कोटींच्या प्लॉट विक्री प्रकरणात जैन, नखादे आणि खानजादा यांच्यात वाद झाले. या जमीन विक्रीतून ६० लाखांचे कमिशन मिळाले होते, त्यात मला वाटा हवा, अशी खानजादा यांची मागणी होती. मात्र कर्जात बुडालेला जैन खानजादा यांना नफ्यातील वाटा देण्यास तयार नव्हता. यासाठी त्याने मारेकरी नखादेबरोबर मिळून खानजादा यांची हत्या करण्याची योजना आखली. दोघांनी सुपारी घेणाऱ्या मारेकऱ्यांशी संपर्क साधून ५० लाखांची सुपारी दिली. त्यापैकी दीड लाख रुपये आगाऊ देण्यात आले. खानजादा यांची हत्या केल्यानंतर साडे तीन लाख देण्यात आले.

हे ही वाचा >> ‘सुपारीबाज’ या शब्दावरून राज ठाकरेंच्या दौऱ्यात गोंधळ पण सुपारी देणं ते अंडरवर्ल्ड; या शब्दाचा प्रवास नेमका कसा झाला?

सुपारी घेण्याऱ्यांनीच केली हत्या

चौकशीदरम्यान नवी मुंबई पोलिसांना समजले की, सतीश जैन याने जमिनीच्या वादातून आमिर खानजादा यांना मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी दिली होती. आमिर खानजादा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रायगड जिल्हाध्यक्ष होता. ठरलेल्या योजनेनुसार खानजादाला मारल्यानंतर जैन स्वतःच्या पायावर गोळी झाडून घेणार होता आणि त्यानंतर पोलिसांत जाऊन हल्ला झाल्याची तक्रार दाखल करणार होता. त्याप्रमाणे त्याने पायावर गोळी झाडली. मात्र मारेकऱ्यांना ठरल्याप्रमाणे ५० लाख देऊ शकत नाही, त्याऐवजी २५ लाख देईल, असे सुमीत जैन याने सांगितले. त्यामुळे मारेकऱ्यांनी सुमीत जैनच्या दुसऱ्या पायावर वार करून त्याला पक्षी अभयारण्याजवळ सोडून तिथून पळ काढला. अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्यामुळे सुमीत जैनचा मृत्यू झाला.

हे ही वाचा >> Crime News : मध्यरात्रीत गळा चिरून पत्नीची हत्या, पण शेजारी झोपलेल्या मैत्रिणीला सुगावाही नाही लागला; पतीच्या कृत्यामुळे खळबळ!

नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला असून त्यामध्ये पाच आरोपींचे नाव नमूद करण्यात आले आहे. विठ्ठल नखादे (४३), जयसिंह उर्फ राजा मुदलियार (३८), आनंद उर्फ अँड्री कुंज (३९), विरेंद्र उर्फ गोरीया कदम (२४) आणि अंकुश उर्फ अँकी सीतापुरे (३५) या आरोपींची नावे एफआयआरमध्ये आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai property dealer contract to kill friend backfires in stunning twist killers killed both builder kvg