नवी मुंबई : “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात “नवी मुंबई इको क्नाईट्स” संघाचे कर्णधार पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासमवेत ४१ हजारहून अधिक विद्यार्थी, युवकांनी या कचरा विरोध लढाईत सहभागी होत स्वच्छतेचा जागर केला. मात्र पाम बीच मार्गालगत आयोजित करण्यात आलेली मानवी साखळी नियोजन मात्र फसले होते.केंद्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये “युथ वर्सेस गार्बेज” या टॅगलाईन नुसार कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. यामध्ये ५३ हजारहून अधिक युवकांनी स्वच्छ नवी मुंबईचा जागर केला. राजीव गांधी मैदानात ४१ हजार तर वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्र येथील सभागृहात लावलेल्या बीग एलईडी स्क्रीनवरुन १२ हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
राजीव गांधी मैदानात नवी मुंबई इको क्नाईट्स संघाचे कर्णधार शंकर महादेवन यांच्या हस्ते नवीन स्वच्छता जिंगलचे अनावरण करण्यात आले. उपस्थित युवक, विद्यार्थ्यांसमवेत ही स्वच्छता जिंगल व आणखी काही लोकप्रिय गीत सादर करण्यात आले.राजीव गांधी मैदानात कार्यक्रम सुरू असताना सकाळी ९.४५ नंतर पावसाने तुरळक हजेरी लावली होती. पर्जन्यवृष्टी होऊनही कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ न देता विद्यार्थी, युवकांनी उत्साही सहभाग घेत स्वच्छतेचा जागर केला.
हेही वाचा : उरण : द्रोणागिरी नोड मधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा
नवी मुंबईतील राजकारण्यांना पालिकेचा मोह सूटेना
नवी मुंबई महापालिकेत गेल्या अडीच वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे. मात्र तरी देखील महापालिकेच्या विविध कार्यक्रमात राजकारणी, माजी नगरसेवक लुडबुड करीत असतात . आज त्याचा प्रत्यय पुन्हा नेरूळ येथील राजीव गांधी मैदानात सुरू असलेल्या स्वच्छ इंडियन स्वच्छता लीग कार्यक्रमात ही आला. या इंडियन स्वच्छता लीग कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी नगरसेवक यांनी उपस्थिती लावली होती. महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असताना हे राजकारणी महापालिकेच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित कसे अशा चर्चांनाउधाण आले होते.
मानवी साखळीचे नियोजन शून्य
इंडियन स्वच्छता लीगच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिके मार्फत प्रथमच : मानवी साखळीद्वारे ७ किमी अंतर एवढा मोठा भारताचा तिरंगा फडकवून नवी मुंबईचे नाव देशाच्या कानकोपऱ्यापर्यंत पोहचणार होते. परंतु नियोजन शून्य असल्याने हा कार्यक्रम वेळेत सुरू झाला नाही. तसेच या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शहरातील नागरिकांची उपस्थिती अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात कमी नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने ,महापालिकेचे कर्मचारी ,सुरक्षा कर्मचारी तसेच लहान मुलांचा आधार घेऊन तिरंगा घेतलेला मानवी साखळी तयार केली, मात्र सात किमीचा पल्ला ही पूर्ण करता आलेला नाही . त्याचबरोबर येथे उपस्थित कर्मचारी, लहान मुले यांना पाणी पिण्याची सोय उपलब्ध नव्हती . तसेच अचानक पाऊस सुरू झाल्याने लहान मुले भिजत होती. नवी मुंबई महापालिकेने मोठा गाजावाजा करत मानवी साखळी बाबत माहिती प्रसारित केली होती. त्यानुसार महापालिकेने हा कार्यक्रम नियोजनबद्ध केला असेल, मात्र प्रत्यक्षात मानवी साखळीचे नियोजन पुरते फसले होते. त्यामुळे काही उपस्थित नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा : नवी मुंबई शहराचे स्वच्छता कार्य वाखाण्याजोगे – मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले मत
जुहू चौपाटीचा पालिका दप्तरी अद्यापही मिनी सिशोर उल्लेख!
नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन २०१५ ला मिनी सिशोरचा उल्लेख जुहू चौपाटी करण्यात आलेला आहे, असा ठराव मंजूर झाला होता. मात्र तरी देखील नवी मुंबई महापालिकेच्या दप्तरी तसेच विविध स्थापत्य विभागात अजूनही मिनी सिशोर असा उल्लेख करण्यात येत आहे. त्यामुळे ही नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.