नवी मुंबई : वाहनांमधून निघणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनचालकांना वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र तरी देखील शहरात मोठ्या प्रमाणात पीयूसी प्रमाणपत्र नसलेली वाहने निदर्शनास आली असून यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३१७३ वाहनांवर कारवाई करत दंडवसुली केली आहे.
शहरातील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. रस्त्यावर वाहने देखील तेवढ्याच प्रमाणात धावत आहेत. शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले असताना आता पीयूसी नसलेल्या वाहनांचा धूर प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. सर्रास विनापीयूसी वाहने शहरात धावताना दिसून येत आहेत. या वाहनांमधून हायड्रोकार्बन, कार्बन मोनाक्साईड असे विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडले जातात. त्याला आळा घालण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट (पीयूसी) बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या वाहनांमधून पर्यावरणाला हानिकारक असे विषारी वायू बाहेर सोडला जात नाही ना यासाठी पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते.
प्रत्येक वाहन चालकांकडे शासन मान्यता प्राप्त सेंटरवर तपासणी करून मिळवलेले प्रमाणपत्र व ते वाहन चालवताना सोबत बाळगणे आवश्यक आहे असे असताना देखील आजही शहरात पीयूसी प्रमाणपत्र तसेच वाहनांमधून विषारी वायू बाहेर सोडणारे वाहने आढळली आहेत. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कडून एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३१७३ वाहनांवर कारवाई करत १०,६६,९०० रुपये दंड वसुली करण्यात आलेली आहे.
बुलेटच्या सायलेन्सरला ब्रेक
तरुणाईमध्ये बुलेटची क्रेझ वाढल्याचे चित्र असून, फटफट आवाज करीत एकमेकांच्या वेगाशी स्पर्धा करणारे अनेक बुलेटचालक शहरभर धुमाकूळ घालत असतात. बुलेटचा सायलेन्सर हा परिवहनाच्या नियमानुसार बसविलेला असतो मात्र काही ग्राहक विकत घेतल्या नंतर बाहेरून बुलेटची दुरुस्ती करणाऱ्या फिटरकडून हा बदल करून घेतात. यामध्ये सायलेन्सर बदलला जातो किंवा त्यावर रबर ट्रॅप बसविला जातो त्यामुळे अचानक ‘फट्ट’ असा फटाक्यासारखा मोठा आवाज होतो.
वाहन चालविताना वाहनांमधून किमान ५०डेसीबीलपर्यत आवाज नियमात आहे. मात्र शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या बुलेटचा आवाज हा ८०ते ९० डेसीबल असतो. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये करण्यात येणारा हा बदल पूर्णतः बेकायदा आहे. त्यापेक्षाही रस्त्यावर वाहतूक सुरू असताना अचानक सायलेन्सरमधून ‘फट्ट’ असा मोठा आवाज होत असल्याने रस्त्यावरील इतर वाहनचालक दचकतात. अशा वेळेस अपघात होण्याची शक्यता असते.
एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यानच्या कालावधीत ४९३ वाहने तपासली असून त्यापैकी ११७ वाहने दोषी आढळली आहेत. यांच्यावर कारवाई करत ६०००० रुपये दंड वसूली करण्यात आली आहे.
पियुसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर तसेच काही वाहनांकडे पीयूसी प्रमाणपत्र आहे, मात्र त्यांच्या वाहनांमधून अतिरिक्त धूर बाहेर पडत आहे, अशा वाहनांची चाचणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच शहरातील हॉर्नच्या कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषणात भर पाडणाऱ्या बुलेट सायलेन्सरचा धुमाकूळ घालणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.गजानन गावंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
वायू प्रदूषण | ध्वनि प्रदूषण | |
तपासलेली वाहने | ५८७६ | ४९३ |
दोषी वाहने | ३१७३ | ११७ |
निकाली प्रकरणे | ३३० | ६० |
एकूण दंडवसुली | १०६६९०० | ६०००० |