नवी मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या अपघातांची संख्या याचे मुख्य कारण म्हणजे वाहन चालवताना वाहतुकीचे नियम डावलून वाहने चालवली जातात. नवी मुंबई शहरातही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. हे अपघात कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाकडून रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनांवर एप्रिल २०२३ पासून ते मार्च २०२४ पर्यंत एकूण ९ हजारहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
आरटीओच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नेहमीच सुरक्षित प्रवास वाहतुकीचे धडे दिले जातात. हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट लावणे, मोबाइलवर बोलत वाहन न चालविणे, डोन्ट ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह याविषयी जनजागृती किली जाते. सुरक्षित वाहतुकीचे नियम सांगितले जातात. तरीही वाहनचालक वाहतूक नियम पायदळी तुडवत बेशिस्तपणे वाहने चालवतात.
हेही वाचा : कर्नाळा पक्षी अभयारण्यात एप्रिलमध्ये २५ टक्केच पर्यटक
कित्येकदा दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करतात. परिणामी अनवधानाने अपघाताला निमंत्रण दिले जाते आणि हेल्मेट नसल्यामुळे त्यांच्या जिवावर बेतते. त्याचबरोबर चारचाकी वाहनचालकदेखील सीटबेल्ट न वापरता बेफिकिरपणे वाहन चालवतात. शिवाय वाहन चालवताना मोबाइलवरदेखील बोलत असतात . त्यामुळे यादरम्यान नजर हटी दुर्घटना घटी अशा घटना घडतात. अपघातांचे हे प्रमाण कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत एकूण ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही विनाहेल्मेट आणि योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनचालकांवर करण्यात आली.
हेही वाचा : उरण: बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब, जूनपर्यंत मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर
आकडेवारी
● विनाहेल्मेट : ३८७५
● सीटबेल्ट : १८८
● वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे : ३९९
● योग्यता प्रमाणपत्र नसणे : ४३६०
● सिग्नल तोडणे : ७४४