नवी मुंबई : क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करेल या रागापोटी थेट हत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्रिकुटा विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विशाल राजपुरोहित, प्रथम आणि साहिल खान अशी यातील आरोपींची नावे आहेत. तर अक्षय हिंगवे असे फिर्यादी याचे नाव आहे. फिर्यादी आणि आरोपी हे मित्र असून ११ तारखेला अपरात्री २ वाजता त्यांचे भांडण झाले. या भांडणात तिन्ही आरोपींनी अक्षयला बेदम मारहाण केली. मात्र सकाळी अक्षय याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करेल अशी माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी अक्षयवर पाळत ठेवली.

हेही वाचा…करंजाडे ते पनवेल स्थानक बसच्या मार्गातील वाहतूक कोंडी दूर करा

त्याच दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास अक्षय हा त्याचा अन्य मित्र लहू शिंदे याच्या समवेत रिक्षातून जात असल्याचे आरोपींनी पाहिले. अक्षय पोलीस ठाण्यात जात असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी नोसिल नाका येथे अक्षयला गाठले व तेथे त्यांनी अक्षय पोलीस ठाण्यात जात असल्याचा राग आल्याने पुन्हा बेदम मारहाण करीत हत्या करण्याच्या उद्देशाने डोक्यावर कोयत्याने वार केला. मात्र हा वार अक्षयने हातावर घेतला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तेथेच तो कोसळला. हे पाहून आरोपींनी पलायन केले. त्यावेळी काही लोकांच्या मदतीने लहू शिंदे यांनी अक्षयला रुग्णालयात दाखल केले. त्याचे हात पाय फ्रॅक्चर झाले आहेत. हातावर कोयत्याचे वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.