नवी मुंबई : पावसाळ्यात पावसाच्या शिडकाव्याने वातावरण स्वच्छ होते, मात्र आता पावसाची उघडीप सुरू असून वाशी सेक्टर २६ येथे पुन्हा धुरकट वातावरण पसरून दर्प वास सुटला होता. त्यामुळे एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांमधून पुन्हा वायू प्रदूषण करण्यास सुरुवात झाली आहे, असा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत.
शहरात महापे औद्योगिक क्षेत्राचा समावेश आहे. वाशी, घणसोली, कोपरखैरणे विभाग हे औद्योगिक पट्ट्याला लागूनच वसलेले आहेत. त्यामुळे औद्योगिक पट्ट्यात होणाऱ्या प्रदूषणाचा फटका या विभागांना अधिक होत असतो. कोपरी गाव, वाशी सेक्टर २६ या परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात हवेत धूलिकण आढळले होते. मात्र हे धूलिकण नसून रसायनेयुक्त वायू हवेत सोडल्याने परिसरात दुर्गंधी येत होती. याबाबत येथील नागरिकांनी वारंवार तक्रार केल्याने प्रदूषण मंडळाने या ठिकाणी गस्त वाढवली होती. तर नवी मुंबई महापालिकेने हवेतील धूलिकणावर नियंत्रण मिळविण्यासाठी धूळशमन यंत्राद्वारे पाणी फवारणी सुरू केली होती.
पावसाला सुरुवात होताच वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांनी थोडी उसंत घेतली होती. मात्र आता पावसाने उघडीप घेतली असून एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांमधून पुन्हा एकदा वायू प्रदूषण करण्याचे प्रकार सुरू झाल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे.
हेही वाचा – करंजा बंदरात अखेर मासळी बाजार सुरू
कोपरी गाव, वाशी सेक्टर २६ परिसरात होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तसेच नवी मुंबई महानगर यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र तरीही शहरातील हवा प्रदूषण कमी होताना दिसत नाही. – संकेत डोके, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा) नवी मुंबई.