नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी १५ दिवस राबवलेल्या विशेष मोहिमेत हजारो कारवाई करण्यात आल्या. विशेष म्हणजे यात विना हेल्मेट, फॅन्सी गाडी क्रमांक पाटी आणि गाडीच्या काचांना लावण्यात येणाऱ्या बेकायदा काळ्या फिल्मवर कारवाई करण्यात आली.
नवी मुंबईतील १६ वाहतूक बीट पोलीस ठाणेअंतर्गत २७ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. त्यात विना हेल्मेट, फॅन्सी क्रमांक पाटी आणि काळ्या फिल्म लावणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अति महत्वाच्या व्यक्तीच्या गाडीच्या काचांना सुरक्षा कारणास्तव काळी फिल्म लावण्यात येते. त्यामुळे गाडीत कोण आणि कुठे बसले हे बाहेरून दिसत नाही. मात्र गल्लीतील छोटे मोठे पुढारी गुंड आणि पुढारीपणा मिरवणारी मंडळीही आपल्या गाडीच्या काचांना काळी फिल्म लावतात. अशा लोकांच्या गाड्यांवर कारवाई करीत काळी फिल्म काढण्यात आल्या. अशा प्रकारे गेल्या पंधरा दिवसात २५६ गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…
दुचाकी चालवताना त्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र तरीही अनेक दुचाकीस्वार हेल्मेट वापरात नाहीत. अशा तब्बल ८ हजार ९१ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. आपल्या नेत्यांचे आडनाव त्यांचे टोपण नावाशी साम्य असणारे क्रमांक घेत ते गाडीच्या क्रमांक पाटीवर लावण्याची क्रेज आहे. यासह अन्य नियमबाह्य असणाऱ्या क्रमांक पाट्या ज्या गाड्यांवर लावण्यात आल्या आहेत अशा ४८१ गाडी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – खारघरमध्ये मृतावस्थेमध्ये सोनेरी कोल्हा आढळला
तसेच यापुढे वाहतुकीचे नियमांची पायमल्ली करुन बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर वेळोवेळी वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे व वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यात नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले.