नवी मुंबई : राज्यातील सर्वात आकर्षक मनपा मुख्यालयांपैकी नवी मुंबई मनपा मुख्यालयाचा आवर्जून उल्लेख केला जातो. मात्र आता याच मुख्यालयात भटक्या श्वानांचा मुक्त वावर असून ८ ते १० श्वान पार्किंगमध्ये फिरत असतात. वास्तविक मनपा मुख्यालय चारही बाजूंनी बंदिस्त असून मुख्यालयात येण्यासाठी केवळ तीन प्रवेशद्वारे आहेत. सर्व ठिकाणी अनेक सुरक्षारक्षकांचा वावर असतो. आता तर बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. तरीही या श्वानांनी मुख्यालयात प्रवेश करीत ठाण मांडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोपरखैरणे येथील एकमेव चांगले ठिकाण म्हणजे निसर्ग उद्यान याच उद्यानात मोठ्या प्रमाणात जॉगिंग करण्यासाठी प्रचंड गर्दी असते. मात्र या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असताना आता तर मनपा मुख्यालयातसुद्धा भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. वाहनतळाच्या जागेत ८ ते १० श्वानांनी ठाण मांडले असून वाहनांच्या खाली झोपलेले श्वान अनेकदा आढळून येतात. त्यामुळे अपघातांत त्यांचा जीव जाण्याचा धोका आहेच. शिवाय गाडीजवळ चार-पाच श्वान एकत्र असतील तर वाहनचालकाला वाहनापर्यंत जाताना जीव मुठीत धरून जावे लागते. अद्याप श्वानाने चावले असा प्रकार घडला नसला तरी घडणार नाही असेही नाही. संबंधित विभागाने याची दखल घेत श्वानांना बाहेर काढणे आवश्यक आहे.

हेही वाचा – फ्लेमिंगो अधिवास, कांदळवन संरक्षणासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; समितीला दोन महिन्यांच्या आत अहवाल देण्याचे आदेश

अधिकाऱ्यांचा फोन आला की आम्ही मुख्यालय इमारतीच्या दरवाजासमोर गाडी घेऊन जातो त्यामुळे वाहनतळाच्या ठिकाणी काय अवस्था हे त्यांना कळत नाही. अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने दिली. या ठिकाणी अभ्यागत तसेच अधिकारी कर्मचारी यांच्या चारचाकी गाड्या उभ्या केल्या जातात. तर गाडी पार्क केल्यावर वाहनचालकांना बसण्यासाठी एक कक्ष आहे. आम्हीही श्वानांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र ते पुन्हा पुन्हा येतात. त्यामुळे एकदाच त्यांना हुसकावून लावत पुन्हा येणार नाहीत अशी तजवीज करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया अन्य एका वाहनचालकाने दिली.

भटके श्वान येथे घाण करतातच, शिवाय गाड्यांच्या टायरवर लघुशंका करतात. बाहेरून उघड्यावर पडलेले खाद्यापदार्थ आणून येथे खातात उरलेले येथेच पडलेले असते, अशी खंत एका सफाई कर्मचाऱ्याने व्यक्त केली.

हेही वाचा – अखेर १४ गावे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात, कार्यकारी अभियंत्यांकडे कामकाजाची जबाबदारी

भटके श्वान अशा पद्धतीने वाहनतळात येत असतील तर ते चुकीचे आहे. याबाबात माहिती घेऊन संबंधित विभागाला निर्देश दिले जातील. – शरद पवार, उपायुक्त, नमुंमपा

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai stray dogs in the municipal corporation security guards at all entrances neglect of navi mumbai municipal administration ssb