पनवेल – नवी मुंबई पोलिसांनी मागील वर्षात ४० वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले विविध अमली पदार्थ बुधवारी दुपारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीच्या भस्मीकरण यंत्रात टाकून नष्ट केले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात काही अमली पदार्थ भस्मीकरण यंत्रात टाकण्यात आल्यानंतर इतर पदार्थ नष्ट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे हे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई पोलिसांनी मागील वर्षी सुद्धा ३९ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील १ कोटी ६१ लाख रुपयांचे अमली पदार्थ याच कंपनीत भस्मीकरण यंत्रात टाकून त्यांची होळी केली होती. याच प्रक्रियेचा भाग म्हणून पोलीस आयुक्तांनी मंत्री नाईक यांच्या उपस्थितीत अमली पदार्थ नष्ट कऱण्याचा कार्यक्रम हाती घेतला.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून मागील सव्वा दोन वर्षांत अमली पदार्थ विक्री, सेवन करणाऱ्यांविरोधात सर्वाधिक गुन्हे नवी मुंबई पोलिसांनी नोंदवले. २०२३, २०२४ या दोन्ही वर्षांत अमली पदार्थविषयक ११४३ गुन्हे नोंदवले. यामध्ये १७४३ संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली.

५६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. अटकेतील १११ नागरिक हे आफ्रीका देशातील आहेत. आफ्रिकन देशातील नागरिकांकडून ३८ कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच पोलीस आयुक्त भारंबे यांनी गेल्या दोनवर्षात अवैध वास्तव्य करणाऱ्या ११३१ आफ्रिकी नागरिकांना नवी मुंबईतून अटक केली. तर २२४ बांगलादेशी नागरिकांना अवैध वास्तव्याच्या गुन्ह्यात अटक केली. पोलीस आयुक्त भारंबे यांनी नशामुक्त नवी मुंबई शहर करण्यासाठी पोलीसांना निर्देश दिल्यामुळे कारवाईमध्ये सातत्य आहे. नागरिकांना अमली पदार्थांविषयी माहिती देण्यासाठी ८८२८-११२-११२ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलीसांना अमलीपदार्थ विक्री करणा-यांचे जाळे उद्धवस्त करण्यात आतापर्यंत तरी यश आले आहे. पोलिसांकडून अमलीपदार्थ विरुद्धची कारवाई सातत्याने सुरूच राहणार आहे. – मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई

नशामुक्त शहर अशी घोषणा करणारे आणि त्या घोषणेनुसार अमलीपदार्थ विरोधात जोरदार कारवाई करुन परिसर नशामुक्त करण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याने नवी मुंबई हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. – गणेश नाईक, वनमंत्री