नवी मुंबई: नवी मुंबई शहरात सकाळपासून स्वागतयात्रा निघत होत्या. मात्र मोठ्या आणि प्रमुख समजल्या जाणाऱ्या शोभायात्रा सकाळी साडेदहानंतर निघाल्या. ढोल ताशांच्या गजरात विविध पारंपरिक वेशभूषा करत निघालेल्या शोभायात्रेत मतदान करा असा संदेशही देण्यात आला. महाराष्ट्राची ओळख असलेल्या सणांपैकी शोभायात्रा अर्थात नववर्ष स्वागत यात्रा असली तरी आसाम, दक्षिण भारतीय वेशभूषा, ते राज्याची परंपरा असलेली वारकरी दिंडी पण सामील झाली होती.
कोपरखैरणे, घणसोली, तुर्भे सानपाडा येथून निघालेल्या स्वागतयात्रा वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाल्या तर ऐरोली राबले येथील शोभा यात्रा दिवा चौकात विसर्जित झाल्या. दुपारपर्यंत या शोभा यात्रा सुरु होत्या. यात वाशी सेक्टर २९ येथील स्वामी नारायण मंदिरापासून एक स्वागत यात्रा निघाली तर एम.जी कॉम्पल्स आणि वाशीतील सेक्टर १४/१५ दत्त गुरू अपार्टमेंट व ए टाइप येथून अशा विविध शोभा यात्रा छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र आल्या होत्या. यात अनेक हिंदू संघटना, इस्कॉन मंदिर बालाजी मंदिर आदींचा समावेश होता. या स्वागत यात्रेत ढोल-ताशा पथक, चेंडा मेलन (दक्षिण भारत वाद्य), बेंजो बिट्स, दुचाकी महिला समुह, आसाम पारंपरिक नृत्य समूह, श्री. स्वामीनारायण गुरुकुल यजरथ, पारंपरिक नृत्य कला समुह, शिवकालीन मर्दानी शस्त्र खेळ, आर्य समाज यज्ञरथ, प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरी विद्यालय झांकी, लेझीम पथक, महात्मा गांधी कॉम्प्लेक्स सेक्टर १४ व १५ मधील महिलांचे सामूहिक नृत्य, १०१ मृदूंग वादक, ध्वज पथक – १ हजार महिला सामील, सजीव नंदी व महादेव वेशभुषा, कोळी महिला समुह वेशभूषा, झाशीची राणी वेशभूषा, छ. शिवाजी महाराज वेशभूषा कुरुक्षेत्र श्री कृष्ण अर्जुन रथ. दशावतार वेशभूषा इस्कॉन नगर कीर्तन आणि सावरकर स्मारक समिती देखावा सादर करण्यात आला होता, अशी माहिती विजय वाळुंज यांनी दिली.
हेही वाचा – डॉ. सुजय यांच्या सभेत ऐकविलेली ती ध्वनीफीत बनावट – निलेश लंके
विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने तुर्भे गाव येथे गुढीपाडवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शांता महिला मंडळाच्या वतीने भजन सादर केले गेले. तसेच नवदुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तुर्भे स्टोअर परिसरामध्ये नववर्ष सद्भावना कलश यात्रा आयोजित करण्यात आली होती. अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी नेहमीप्रमाणे श्री गणेश मंदिर येथे गुढी उभारली गेली.
हेही वाचा – उरणमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू
सदर शोभा यात्रेत वाहतूक पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. यात्रा आयोजकांशी दोन दिवसांच्या पूर्वीच समन्वय साधत मार्ग आणि वेळ निश्चिती करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात उशिरा स्वागत यात्रा निघाल्या तरी पोलिसांचा बंदोबस्त जागोजागी होता. कुठेही वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ न देता स्वागत यात्रेला मार्ग काढून दिला जात होता. कोपरखैरणे ते वाशी मार्गावर सर्वाधिक व सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या स्वागतयात्रा निघाल्या. जुहूगाव मंदिर, वाशी सेक्टर ९/१० अशा काही ठिकाणी थोडी बहुत वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आयोजक आणि पोलिसांच्या सतर्कतेने लगेच उपाययोजना केल्या गेल्याने फार मोठी अशी वाहतूक कोंडी कोठेही झाली नाही.