स्मार्ट सिटीतील एक स्मार्ट उपक्रम
* घनकचरा व्यवस्थापनासाठी आरएफआयडी चाचणी यशस्वी
* दोन महिन्यांत सर्व कचराकुंडय़ांवर आरएफआयडी लागणार
केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी निवड केलेल्या देशातील तिसऱ्या शहराने स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले असून, नवी मुंबई पालिका प्रशासनाने शहरातील सुमारे २५ हजार कचराकुंडय़ांवर आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईस) लावण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाशी आणि कोपरखैरणे येथील दोनशे कचराकुंडय़ांवर आरएफआयडी लावण्याची चाचणी यशस्वी झाली असून, कोपरखैरणे येथील ५० कचराकुंडय़ांवर मोबा कंपनीने घेतलेली चाचणी स्पष्ट व पारदर्शक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या कंपनीच्या वतीने येत्या दोन महिन्यांत शहरातील सुमारे २३ हजार कचराकुंडय़ांवर आरएफआयडी लागल्याचे दिसून येणार आहे. अशी उपाययोजना करणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरणार आहे.
नवी मुंबई शहरातील दैनंदिन घनकचरा साफसफाई हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. कचराकुंडीच्या बाहेर पडलेले कचऱ्याचे ढीग, त्यावर तुटून पडणारी कुत्री, वराह, माश्या, उंदीर असे काही महिन्यांपूर्वी असलेले दृश्य आता जवळजवळ नामशेष झाले आहे. त्याऐवजी एका रंगाचे, एका ढंगाचे गणवेष घातलेले साफसफाई कर्मचारी, चकाचक कचराकुंडय़ा, कचरा वाहतूक करणारी नवीन वाहने रस्त्याने धावताना दिसून लागल्याचे चित्र आहे. त्यात केंद्र सरकारने या शहराची स्मार्ट सिटीमध्ये निवड केल्याने पालिकेची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेबाबत नवीन उपाययोजना केल्या जात असून, यात घनकचरा व्यवस्थापनप्रमुख उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजले जातीने लक्ष घालत आहेत. घनकचरा वाहतुकीचे नव्याने कंत्राट देताना डिसेंबर २०१४ रोजी कचराकुंडय़ांवर आरएफआयडी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा खर्च कंत्राटदाराच्या एकूण खर्चामध्ये गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेला यासाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही.
पालिकेने या तंत्रज्ञानाची नुकतीच वाशी व कोपरखैरणे येथे दोनशे कचराकुंडय़ांवर हा आरएफआयडी टॅग लावून चाचणी घेतली आहे. त्यासाठी बंगळुरू, पुणे, नवी मुंबई, येथील चार कंपन्यांनी या दोनशे कचराकुंडय़ांवर टॅग लावले होते. त्यातील मोबा या कंपनीने कोपरखैरणे येथे लावलेल्या आरएफआयडी टॅगची क्ल्यारिटी चांगली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या कंपनीला कामाचे आदेश देण्यात आले असून येत्या दोन महिन्यांत ही कंपनी शहरातील सर्व कचराकुंडय़ांवर हे आरएफआयडी टॅग लावण्यात यशस्वी होणार आहे. नवी मुंबईत दररोज तयार होणारा घनकचरा उचलण्यासाठी ९१ कंत्राटदार असून दोन हजार ६४५ साफसफाई कार्मचारी आहेत. कचरा वाहतुकीचे काम यात वेगळे असून त्यासाठी सातशे कर्मचारी कार्यरत असून ए. जी. इन्व्हायरो या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे.
नवी मुंबईचे स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल
केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी निवड केलेल्या देशातील तिसऱ्या शहराने स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले
Written by चैताली गुरवguravchaitali
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-09-2015 at 07:19 IST
TOPICSसॅनिटायझेशन
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai toward to sanitation