लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई: नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून एप्रिल महिन्यात तब्बल ६२ हजार ५९९ एवढ्या कारवाई केल्या आहेत. त्यातील १ हजार ९८९ प्रकरणे लोकअदालत मध्ये निकाली लागले असून त्यातून ९ लाख ९० हजार ९५० दंड वसुली झाली आहे.
शिक्षित शहरात अत्यंत बेशिस्त वाहतूक हे नवी मुंबईचे चित्र असून या बाबत आता वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. केवळ एप्रिल महिन्यात ६२ हजार ५९९ एवढ्या कारवाई केल्या आहेत. ज्यात अतिवेगाने वाहन व चालविणे सिटबेल्ट ६ हजार ८४३, विना हेल्मेट ७ हजार ८९७, सिग्नल तोडणे १२८, मद्य प्राशन करून वाहन चालविणे १२ हजार ४६६, विना हेल्मेट १हजार ८९८, धोकादायक वाहन चालविणे ९१, गाडी चालवताना मोबाईल संभाषण एक हजार २१ अशा महत्त्वाच्या वाहतूक नियम भंग कारवाई केल्या आहेत तर बाकी अन्य कारवाई आहेत. या कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १६ वाहतुक शाखांकडून एप्रिल २०२३ मध्ये मोटर वाहन कायदा कलमान्वये करण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा- खोदलेले रस्ते नवी मुंबईकरासाठी डोकेदुखी, पावसाळ्यापूर्वी अनेक कामे पूर्ण करणार
३० एप्रिल रोजी पार पडलेल्या लोक अदालत मध्ये एकूण १९८९ इतक्या केसेस निकाली काढण्यात आलेल्या असून ९ लाख ९० हजार ९५० एवढा दंड वसुल केला आहे. याबाबत वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की “घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे” एवढेच लक्षात ठेवून गाडी चालावत जा असे आवाहन आम्ही करीत आहोत. यापुढेही वाहतुकीचे नियमांची पायमल्ली करुन बेजबाबदार पणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर वेळोवेळी वाहतुक विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे व वाहतुक सुरळीत ठेवण्यात नवी मुंबई वाहतुक विभागास सहकार्य करावे.