नियोजनबध्दरित्या वसवलेल्या नवी मुंबई शहरात पामबीच मार्गावर दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न निर्माण अतिशय बिकट बनत चालला असून बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून वाशीपर्यंत पामबीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नसताना वाशी उपनगर लागताच रस्त्याच्या दुतर्फा पामबीच मार्गावर पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.याकडे नवी मुंबई वाहतूक पोलीसांचेही व पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नवी मुंबईचा क्विन नेकलेस समजल्या जाणाऱ्या पामबीच मार्ग हा वेगवान व देखणा मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे.परंतू याच मार्गावर वाशी रेल्वे उड्डाणपुल सोडताच वाशी उपनगराला सुरुवात होते.या उपनगराच्या पहिल्याच सिग्नलपासून ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत बेकायदा पार्किंग पाहायला मिळते.त्यातच सतरा प्लाझा परिसरात बेकायदा पार्किंगने वाहतूक व्यवस्थेचा पुरता खेळखंडोबा करुन टाकल्याचे चित्र आहे. या मार्गावर स्त्यावरच बेकायदा पार्किंग ही पालिकेची व वाहतूक व डोकेदुखी ठरली आहे.शहरात “व्हॅले पार्किंगचा” फंडा येथे सुरु असून वाशीतील सतरा प्लाझासह शहरातील विविध मॉल व कमर्शिअल पार्कसमोर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत लोकसत्ताने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तत्कालिन आयुक्त रामास्वामी यांनी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.तर सतरा प्लाझाच्या व पुढील वाहने दुरुस्त व सजावट करण्याच्या दुकानांच्या बाहेरील बाजुला कायमस्वरुपी भिंत बांधण्याचे प्रस्तावित होते.परंतू ह्या सर्व उपाययोजना लालफितीच्या फेऱ्यात अडकल्याने अद्याप कोणताही ठोस उपाय न झाल्याने येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.
हेही वाचा >>> किरकोळ बाजारातील दरांवर नियंत्रण कोणाचे? कांदा आणि टोमॅटोची दुप्पट दराने विक्री
पामबीच मार्गावरील रस्त्यावर व्हॅले पार्किंग सुरु आहे.वाशीत आरेंजा कॉर्नर ते कोपरी पुलापर्यंत सातत्याने येथे बेकायदा पार्किंग केले जाते,या ठिकाणी बेकायदा गॅरेज व इतर गाड्यांच्या विविध वस्तूंची विक्रीची दुकाने आहेत. पालिकेने या मार्गावर जवळजवळ १२५ नो पार्किंगचे बोर्ड लावले आहेत. पामबीच मार्गावरील बेकायदा पार्किंगबाबत पालिकेने व वाहतूक विभागाने बेकायदा वाहनांवर कारवाई केल्यावर त्यांची पाठ फिरताच पुन्हा गॅरेजवाल्यांनी व वाहनचालकांनी बेकायदा पार्किंगला बिनधास्तपणे रस्त्यावरच पार्किंगला सुरवात केली आहे.पामबीच हा शहरातील वेगवान मार्ग परंतू याच मार्गावर पार्किंगच्या समस्येने पालिका व सिडकोच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.सतरा प्लाझा येथे रस्त्याच्या कडेला सिंगल पार्किंग होत आहे.सतरा प्लाझामध्ये विविध प्रकारची दुकाने,कार्यालये आहेत.
हेही वाचा >>> गडहिंग्लज : विनयभंग प्रकरणी नवी मुंबईत गुन्हा दाखल; वाचा नेमका काय प्रकार आहे?
कोपरीपासून विविध गाड्यांच्या खरेदीविक्रीची व दुरुस्तीची दुकाने आहेत.त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग पाहायला मिळत आहे.तुर्भे सेक्टर १९ ई व १९ सी याठिकाणी नियमानुसार वेअर हाऊस आहेत.परंतू व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे पामबीच मार्गाच्या बाजुने दुकानांचा प्रवेश सुरु केला आहे.त्यामुळे या परिसरात पामबीच या वेगवान मार्गावरच बेकायदा पार्किंग केले जात आहे. याबाबत तत्कालिन जिल्हाधिकारी व सध्याचे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांनीही नवी मुंबई पालिकेला फटकारले होते. त्यामुळे आता नार्वेकर यांनीही याबाबत ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. या सतरा प्लाझा परिसरात विविध हॉटेल,मॉल,गाड्यांची शो रुम्स असून त्यांचे प्रवेशद्वार पामबीच रस्त्याच्या बाजुला नसून ते मागील सर्विस रोडला असतानादेखील व्यावसायिक वापरासाठी या ठिकाणच्या दुकानांचे प्रवेशद्वार पामबीच मार्गाच्या बाजुला आहेत.येथील व्यावसायिकांनी पालिकेकडे वापरातील बदलाबाबतही अर्ज केले होते.परंतू पालिकेने ते तात्काळ फेटाळले होते.परंतू सद्यस्थितीत येथील पार्किंगची समस्या वाढून दुपप्ट झाली असून सतरा प्झाझाच्या विरुध्द बाजुला सोना सेंटर बसथांबा आहे.तेथेही बेकायदा पार्किंग केले जात आहे.त्यामुळे पालिका आयुक्तांनी व वाहतूक विभागाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
अपघाताला आमंत्रण….दुपटीने वाढले बेकायदा पार्किंग
नवी मुंबईमधील अंतर्गत उपनगरात वाहतूकीचा व पार्किंगचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून सतरा प्लाझा परिसरात दुपटीने बेकायदा पार्किंग होत आहे.त्यामुळे पालिका व वाहतूक विभागाने ही बाब गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचे चित्र आहे.
पामबीच मार्गावरील सतरा प्लाझा परिसरात दोन्ही बाजुला होणाऱ्या बेकायदा पार्किंबाबत दोन तीन वेळेला कारवाई करण्यात आली होती परंतु आता पालिकेच्या मदतीने विशेष कारवाई करण्याचे नियोजन करून कारवाई करण्यात येईल. तिरुपती काकडे,उपायुक्त, वाहतूक