नवी मुंबई : नवी मुंबई परिवहन सेवेला यंदाही पालिकेकडूनन मिळणाऱ्या २७० कोटी अनुदानावर अवलंबून राहणार आहे. सातत्याने पालिकेच्या अनुदानावर भिस्त न ठेवता आगामी काळात परिवहन उपक्रमाच्या वाशी या मध्यवर्ती असलेल्या डेपोच्या वाणिज्य विकासाच्या मॉडेलनुसार शहरातील कोपरखैरणे व बेलापूर डेपोच्या वाणिज्य विकासातून परिवहन उपक्रमाला आर्थिक सक्षमता निर्माण करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार असल्याचे चित्र आहे.

पालिका परिवहनचा जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याच्यादृष्टीने परिवहन उपक्रम प्रयत्न करत असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिली. तर आगामी काळात उत्पन्न अधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न असल्याचा विश्वास पालिका आयुक्त यांनी व्यक्त केला आहे. आरंभीच्या शिलकेसह एकूण महसुली भांडवली जमा ५३४ कोटी व महसुली व भांडवली खर्च ५३३ कोटी ९० लाख ६० हजार खर्चाचे आणि ९ लाख ४० हजार शिलकीच्या खर्चाचा अंदाज आज सादर व मंजूर करण्यात आला.

पालिकेची परिवहन सेवा सुरुवातीपासूनच तोट्यात आहे. त्यामुळे परिवहन सेवेला सातत्याने नवी मुंबई महानगरपालिकेकडून अनुदान देऊन सावरण्यात येत आहे. सन २०२२-२३ मध्ये १८१ कोटी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात पालिकेकडून २७४ कोटी रुपयांचे अनुदानाची तरतुद केली होती.तर २०२४-२५ मध्ये ३१५ कोटी तर यंदा ही तरतूद कमी करुन २७० कोटी अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वाशी बसस्थानकाच्या धर्तीवर कोपरखैरणे व बेलापूर या दोन बसस्थानकांचा वाणिज्य विकास आगामी काळात पाहायला मिळणार आहे.

पालिका सातत्याने अनुदान देत असताना दुसरीकडे वाणिज्य संकुलेही वेळेत भाड्याने जाणे गरजेचे आहे. अन्यथा त्या वाणिज्य सुंकुलांची देखभाल करणेही पालिका परिवहन उपक्रमाला जड जाईल.त्यामुळे परिवहन सेवा अधिकाधिक आर्थिक सक्षम बनवणे हे आयुक्त व तेथील अधिकाऱ्यांवर अंवलंबून आहे. तसे न झाल्यास परिवहन उपक्रम अधिक डबघाईला जाईल त्यामुळे पालिकेने योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. – समीर बागवान, माजी परिवहन सदस्य

परिवहन सेवा हा अधिकाधिक आर्थिक सक्षम बनवण्याचा सातत्याने प्रयत्न असून आयुक्तांच्या सूचनेनुसार वाणिज्य संकुलातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याच्या प्रय़त्नात आहोत. परिवहनचे वार्षिक आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. – योगेश कडुस्कर, व्यवस्थापक,परिवहन उपक्रम

परिवहन उपक्रमाची उद्दिष्टे

  • पालिका निधीतून नवीन ५० सीएनजी बस खरेदी
  • १५ व्या वित्त आयोग किंवा शासन निधीतून ५० इलेक्ट्रीक बस खरेदी
  • परिवहन उपक्रमाच्या आगार व बस टर्मिनस येथे उपहारगृहे सुरु करणे
  • टायर रिमोल्डिंग प्लांटचा व्यावसायिक वापर करणे
  • सौरऊर्जा प्रकल्प उभारणी करणे
  • परिवहन उपक्रमाच्या आगार व टर्मिनसमधील सीएनजी,डिझेल व चार्जिंग स्टेशनचा व्यावसायिक वापर करणे

Story img Loader