नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ पाच मिनिटांत एका टेम्पोत ठेवण्यात आलेली अडीच लाखांची रोकड अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे समोर आले आहे. सदर वाहन चालक प्रवेशद्वारावर वाहन लावून प्रवेश पावती घेण्यासाठी उतरला होता. याच केवळ पाच मिनिटांत ही चोरी झाली आहे. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आशियातील सर्वात मोठी समजली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईत असून एवढी मोठी बाजार समिती असली तरी सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे अनेकदा समोर आले आहे. असाच प्रकार शनिवारी घडला आहे. येथील व्यापारी संतोष खेडेकर यांनी  माथाडी कामगार  दिनकर साळुंके यांच्याकडे २ लाख ८० हजार रुपयांची रोकड दिली. ही रक्कम सातारामधील धुमाळवाडी येथे राहणारे हनुमंत शिंदे यांना देण्यास सांगितले होते. त्यानुसार धुमाळवाडीला जाणारे टेम्पो चालक व यातील तक्रारदार संतोष फडतरे यांच्याकडे सदर रक्कम साळुंके यांनी दिली. ही रक्कम ठेवलेली पिशवी वाहन चालकाच्या आसनाला मागच्या बाजूने फडतरे यांनी अडकवली. टेम्पो फळ बाजाराच्या प्रवेशद्वारावर लावून नेहमी प्रमाणे फडतरे यांनी प्रवेशिका घेण्यासाठी खाली उतरले आणि प्रवेशिका घेऊन गाडीत बसले. याला केवळ चार ते पाच मिनिटे लागली. मात्र या वेळेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीतील २ लाख ८० हजार रोकड ठेवलेली पिशवी चोरी केली.

हेही वाचा – उरणमध्ये शारदोत्सवात आदिशक्तीचा जागर

हेही वाचा – नवी मुंबई पोलीस दलाच्या नावाचे एक्सवर बनावट खाते

जेव्हा फडतरे गाडीत बसले त्यावेळी आसनाला अडकवलेली पिशवी आढळून न आल्याने त्यांनी खूप शोधाशोध केली मात्र पिशवी आढळून न आल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. सदर तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित पाटील हे पुढील तपास करीत आहेत.