नवी मुंबई : नवी मुंबई शहरात तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात १५२ कोटी रुपये खर्चातून शहरात १५२४ सीसीटीव्हींची नजर शहरावर राहणार होती. परंतु ३ वर्षानंतरही अद्याप १०० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले नाहीत. १५०० पैकी १३०० कॅमेरे लागले असून त्यातील फक्त ४१० सीसीटीव्हीच कार्यरत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात १५२४ हाय डेफिनेशन कॅमेरे, स्पीड डिटेक्शन कॅमेरे, ट्रॅफिक कॅमेरे, आणि एव्हिडन्स कॅमेरे बसवण्याची निविदा २०२२ मध्ये मे. टाटा ॲडव्हान्स सिस्टीमला दिली होती. परंतु अद्याप अंमलबजावणीच्या पातळीवर टाटासारख्या विश्वासार्ह कंपनीला देखील तब्बल ३ वर्षानंतर प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात यश आले नाही. सध्या शहरात १३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यातील केवळ ४१० कॅमेरे प्रत्यक्षात कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.

पालिका मुख्यालयात सीसीटीव्ही नियंत्रणाचा मोठा कक्ष आहे. परंतू पोलीस प्रशासन व पालिका प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने वर्तमानात पोलीस यंत्रणेकडे केवळ ४ संगणक असून त्याद्वारे सीसीटीव्ही तपासणी केली जाते. पालिका मुख्यालयात सुसज्ज अशी सीसीटीव्ही मॉनिटरिंग यंत्रणा असल्याने सीसीटीव्ही ज्या उद्दिष्टपूर्तीसाठी बसवलेले आहेत त्यादृष्टीने पोलीस व पालिकेने संयुक्त मॉनिटरिंग व्यवस्था करणे नितांत गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते संजय सोनावणे यांनी व्यक्त केले. याबाबत मे.टाटा ॲडव्हान्स सिस्टीम कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

संबंधित ठेकेदाराने ९५ टक्के पेक्षा अधिक कॅमेरे लावलेले आहेत. परंतु अद्याप १०० टक्के काम पूर्ण न झाल्यामुळे देखभाल दुरुस्तीचे काम पालिकेने दिलेले नाही. पालिका प्रशासनाने ठेकेदाराला १५ दिवसाचा अंतिम अल्टीमेटम दिलेला आहे. शिरीष आदरवाड, शहर अभियंता ,नवी मुंबई महापालिका

नवी मुंबई करदात्या नागरिकांच्या दृष्टीने सीसीटीव्हीचे अनन्यसाधारण महत्व आहे. सीसीटीव्ही प्रोजेक्ट १०० टक्के कार्यान्वित असणे गरेजेचे आहे. अनेक वर्षात हा प्रकल्प पूर्ण होत नाही हे दुर्दैव आहे. पालिका आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निवेदन देऊन पाठपुरावा करू.अरुण कागले, सदस्य सजग नागरिक मंच, नवी मुंबई</p>