नवी मुंबई : मागील वर्षी शालेय साहित्य आणि गणवेश वाटपात कोणताही घोटाळा अथवा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून महापालिकेने ई-रुपीच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून शालेय गणवेश आणि साहित्य देण्यात येणार होते, परंतु अनेक त्रुटींमुळे नियोजन बारगळले होते. विद्यार्थ्यांना केवळ गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्यात आली होती. यंदा मात्र शाळा सुरू होताच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती शिक्षण विभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवी मुंबई शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने अत्याधुनिक शाळांच्या इमारती उभारल्या आहेत. पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, मोजे यासासारखे शालेय साहित्य, गणवेश देण्यात येतात.
हेही वाचा – उरणमध्ये १५ गावांना पुराचा धोका, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा जाहीर
नवी मुंबई महापालिका शाळेतील सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे राज्यातील इतर महापालिका शाळांपेक्षा नवी मुंबई पालिका शाळेमधील पटसंख्यादेखील वाढत आहे. सध्यास्थितीत ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय साहित्य आणि गणवेश वाटपात कोणताही भ्रष्टाचार होऊ नये म्हणून महापालिकेने ई-रुपीच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य देण्याचे नियोजन होते. परंतु काही त्रुटींमुळे वेळ लागला. यंदा १५ जूनला शाळा सुरू होताच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शैक्षणिक साहित्य, गणवेश देण्याचा निर्धार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
हेही वाचा – उरणमधून महाविकास आघाडीला मताधिक्य, निकालातून विधानसभेची नांदी
१५ जूननंतर शाळा सुरू होताच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्याचे नियोजन आहे. – योगेश कडूसकर, शिक्षण अधिकारी, नमुंमपा