उरण : सिडकोच्या द्रोणागिरी ते पागोटे या सागरी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गाची दुरुस्ती मे २०२४ मध्ये करण्यात आली आहे. मात्र अवघ्या काही महिन्यांतच हा मार्ग नादुरुस्त झाला आहे. यात जड कंटेनर वाहनांची संख्या जास्त असल्याने खोपटे पूल चौकात पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत. या मार्गावरील खडी उखडल्याने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना अपघात होऊ लागले आहेत.
नवी मुंबईत जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने कंटेनर वाहनाखाली तो येता येता वाचला. गुरुवारी ही घटना घडली. तर याच चौकात एसटी बस आणि रिक्षा यांचा अपघात झाला होता. द्रोणागिरी नोड ते खोपटे पूल चौक या मार्गावरही खड्डे पडले आहेत. या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने प्रवाशांना अंधार आणि खड्डे यांचा सामना करावा लागत आहे. उरणच्या जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गाला हा सागरी महामार्ग जोडण्यात आला आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदरातून खोपटे आणि उरणच्या पूर्व विभागातील अनेक गोदामात ये-जा करणाऱ्या हजारो जड कंटेनर वाहनांमुळे हा मार्ग सतत वर्दळीला बनला आहे.
हेही वाचा : रब्बी हंगामात कडधान्यांची लागवड; उरणमध्ये वाल, चवळी, हरभरा, मूग पिकांची लगबग
त्याचप्रमाणे या मार्गावरून उरण, द्रोणागिरी नोड, खारपाडा किंवा अलिबागला जाणारी लहान प्रवासी वाहनेही याच मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे जड व प्रवासी वाहनांसाठी महत्वाचा असलेल्या या मार्गावरचे खड्डे हे अपघाताचे कारण ठरू लागले आहेत.