नवी मुंबई : मुंबई, ठाणेसह आजूबाजूच्या शहरांवर पाणीकपातीचे संकट असताना दुसरीकडे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मात्र पुढील ८० दिवस पुरेल एवढा जलसाठा आहे. परंतू नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
राज्यातील विविध धरणांत झपाट्याने पाणीसाठा कमी होत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत फक्त ४० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा शिल्लक असताना नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या ३६.६२ टक्के जलसाठा आहे. नवी मुंबईकरांना पुढील ८० दिवस पुरेल इतका जलसाठा धरणात आहे.
हेही वाचा : नवी मुंबई: १५ मेपर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश
राज्याच्या विविध भागांत तसेच मुंबई शहरावरही पाणीकपातीचे संकट असताना नवी मुंबईकरांना मात्र २६ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येईल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. तरीदेखील नवी मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करायला हवा.
लोकसंख्यावाढ पाहता नवी मुंबई महापालिकेने भिरा कुंडलिका प्रकल्पातील तसेच नवीन जलस्राोत निर्माण करण्याचेही नियोजन केले आहे. महापालिकेला एमआयडीसीकडून हक्काचे ८० एमएलडी पाणी मिळत नसून फक्त ७० एमएलडीपर्यंत मिळत आहे. पालिका प्रशासनाने प्रतिमाणसी फक्त २०० लिटरप्रमाणे नियोजन करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : वर्षभरात ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई, नवी मुंबई ‘आरटीओ’चे पाऊल
मोरबे धरणातून पावसाळ्यापर्यंत सुव्यवस्थित पाणीपुरवठा होईल याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येत असून नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा.
डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नमुंमपा