नवी मुंबई : फ्लेमिंगोंसह अन्य परदेशी पाहुण्यांचे थवे, पाणथळी आणि विस्तीर्ण असा निसर्गरम्य खाडी किनारा लाभलेल्या नवी मुंबईतील बहुचर्चित पाम बीच मार्ग नव्या वर्षापासून क्रीडाप्रेमींसाठी प्रत्येक रविवारी सकाळच्या ठराविक वेळेत खुला केला जाणार आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डाॅ.कैलाश शिंदे यांनी या संबंधीचा एक प्रस्ताव पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे पाठविला आहे. त्यानुसार पाम बीच मार्गावरील एक मार्गिका दर रविवारी सकाळी पाच ते दहा या वेळेत सायकल, धावपटूंसाठी खुली केली जाईल. या कालावधीत याठिकाणी इतरही क्रीडा प्रकार करु इच्छिणाऱ्यांसाठीही मार्गिका खुली असेल. या काळात आसपासच्या परिसरात रहाणाऱ्या रहिवाशांना प्रवासासाठी खोळंबा होऊ नये अशा पद्धतीची आखणी केली जात आहे.
नवी मुंबईतील पाम बीच मार्ग हा प्रवाशांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. वाशी येथील मोराज सर्कल ते नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय असलेल्या बेलापूर दरम्यान आठ किलोमीटरच्या या मार्गावर दररोज सायकल तसेच धावपटूंची रेलचेल दिसून येते. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आयोजित केली जाणारी मुंबई मॅरेथाॅनच्या पार्श्वभूमीवर नियमीत सरावासाठी या मार्गाची निवड करणाऱ्या धावपटूंची संख्या बरीच मोठी आहे. थंडीच्या हंगामात येथील पाणथळींच्या जागांवरील निसर्ग संपदा न्याहाळण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा आकडाही बराच मोठा असतो. या मार्गावरील दोन्ही बाजूंनी १६ किलोमीटर अंतराची सायकल रपेट अथवा धाव घेणे अनेकांचा आवडीचा पर्याय असतो. या मार्गास लगत असलेल्या ज्वेल ॲाफ नवी मुंबई तसेच महापालिका मुख्यालयालगत अनेक धावपटू प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षणाचे स्वतंत्र वर्गही चालविले जातात. त्यास मिळणारा प्रतिसाद हा अलिकडे क्रीडा संस्कृतीच्या माध्यमातून आरोग्यवर्धनाकडे वळणाऱ्या मोठ्या वर्गास आकर्षित करू लागला आहे. पाम बीच मार्गाचे हे महत्व लक्षात घेऊन आयुक्त डाॅ.शिंदे यांनी हा मार्ग रविवारच्या दिवशी ठराविक वेळेत केवळ क्रीडा प्रकारांसाठी आणि त्या माध्यमातून होणाऱ्या आरोग्य वर्धनासाठी खुला करता येईल का यादृष्टीने चाचपणी सुरू केली असून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
हेही वाचा…जलवाहतुकीचे मार्ग, प्रवासी सुरक्षेचा प्रश्न, समुद्रातील वाढती वर्दळ धोकादायक
क्रीडाप्रेमींच्या बैठकीत चर्चा
महापालिका आयुक्त डाॅ.कैलाश शिंदे हे स्वत: उत्तम पट्टीचे धावपटू आहेत. दक्षिण आफ्रिकेतील काॅम्रेड, बोस्टनमधील धावपटूंच्या क्षमतेचा कस पहाणाऱ्या मॅरेथाॅनमध्ये त्यांनी यापूर्वी यश संपादन केले आहे. नवी मुंबई महापालिकेने रविवारी आयोजित केलेल्या नवी मुंबई स्वच्छता मॅरेथाॅनमध्ये त्यांनी २१ किलोमीटरचे अंतर चांगल्या वेळेत पूर्ण केले. क्रीडा संस्कांराची उत्तम समज असलेल्या डाॅ.शिंदे यांनी या मॅरेथाॅनच्या आयोजनानिमित्त शहरातील धावपटू तसेच क्रीडा प्रशिक्षकांची एक बैठक शनिवारी महापालिका मुख्यालयात आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी पाम बीच मार्गावरील रविवारच्या नियोजनाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच यासंबंधी उपस्थित धावपटू, सायकलपटू तसेच क्रीडा प्रशिक्षकांची मतेही जाणून घेतली.
हेही वाचा…एमआयडीसीकडून उरणमध्ये दोन दिवसांची पाणीकपात, दर मंगळवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
कसे असेल नियोजन?
पाम बिच मार्गावरील एक मार्गिका प्रत्येक रविवारी सकाळच्या पाच ते दहा या वेळेत धावपटू, सायकलपटू तसेच चालणाऱ्यांसाठी खुली केली जाणार आहे. या काळात या मार्गिकेवरील वाहने दुसऱ्या मार्गिकेवर दुभाजकाची व्यवस्था करुन सुरू ठेवली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंबंधी नवी मुंबई पोलिसांसोबत प्राथमिक प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते.
जानेवारी महिन्यापासूनच हे नियोजन अंमलात आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न असून नवी मुंबईच नव्हे तर संपूर्ण महानगर प्रदेशातील वेगवेगळ्या भागांमधील क्रीडाप्रेमींसाठी ही पर्वणी ठरेल, असा विश्वास डाॅ.शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त या प्रस्तावास सकारात्मक असून शहरातील एक महत्वाचा रस्ता अशाप्रकारे क्रिडा संस्कृती आणि आरोग्याचे धडे देणारा ठरावा हा मागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिका दरवर्षी शहरात स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी मॅरेथाॅनचे आयोजन करत असते. शहरात क्रिडा संस्कृती वाढीस लागावी तसेच आरोग्य संवर्धनासाठी नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी महापालिका प्रयत्नशील असून पाम बीच मार्गावर नव्या वर्षात केला जाणारा प्रयोग हा याच सकारात्मकतेचा भाग आहे. नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी रविवारची सकाळ साजरी करण्यासाठी यावे. डाॅ.कैलाश शिंदे, आयुक्त, न.मुं. म.पा.