पनवेल : देशाच्या प्रधानमंत्रींनी मुंबईचा हिरा उद्योग गुजरामधील सूरतला नेला. आज त्यांच्या हस्ते सूरतमध्ये हिरा उद्योग प्रकल्पाचे मुहूर्तमेढ रचली जात आहे. मात्र हा हिरा उद्योग आम्ही मुंबईला टिकविण्यासाठी त्यावेळी व्यापा-यांना जागा दिली. यामुळे हजारोंना रोजगार मिळाले. प्रधानमंत्र्यांनी मुंबईचे विकास प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याची काळजी घेतली. त्यामुळे अखंड देशाचा विकास करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही, अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याचा आरोप शनिवारी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. पनवेलमधील कळंबोली उपनगरात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्वाभिमानी मेळाव्यात पवार बोलत होते.
हेही वाचा >>> पनवेल तालुक्याला स्वतंत्र तहसीलदार नेमण्यास सात महिन्यांचा विलंब
शनिवारी सायंकाळी कळंबोली उपनगरामधील शामल मोहन पाटील विद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा स्वाभिमानी मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, एमजीएम वैद्यकीय शैक्षणिक संस्थेचे कमल किशोर कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा अध्यक्ष मेहबूब शेख, प्रभाकर देशमुख, रोहीणी खडसे, गुलाबराव जगताप, जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, प्रशांत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्र (नैना) प्रकल्पबाधित शेतक-यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना नैना प्रकल्प रद्द करावा याविषयी मागणीचे निवेदन दिले. पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये नैना बाधित शेतकऱ्यांना आश्वासित करताना दिल्ली येथे सूरु असलेले आधिवेशन संपल्यावर राज्य सरकारला विश्वासात घेऊन बैठकीचे आयोजन करु तसेच शेतकऱ्यांचा विकास व प्रकल्पांना विरोध नसून शेतक-यांना उद्धवस्त होऊ देणार नाही अशी ग्वाही पवार यांनी दिली. पवार यांनी माथाडी कामगारांची कळंबोलीतील सिडकोच्या जिर्णावस्थेमध्ये घरांविषयी चिंता व्यक्त केली.